नवी दिल्ली - युक्रेनवर रशियाकडून सुरू असलेल्या भयंकर हल्ल्यांमुळे तेथील परिस्थिती अधिकाधिक भीषण होत चालली आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाला होता. दरम्यान, युक्रेनमध्ये आज अजून एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी पंजाबमधील रहिवासी होता. या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण स्टोक असून, तो बऱ्याच काळापासून रुग्णालयात दाखल होता.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष आता भयानक वळणावर आला आहे. दरम्यान, या युद्धामध्ये युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले भारतीय विद्यार्थीही भरडले जात आहेत. त्यातच खारकिव्हमध्ये भीषण गोळीवारामुळे एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. परराष्ट्र मंत्रालयाने त्याच्या मृत्यूची माहिती दिली होती. हा विद्यार्थी कर्नाटकमधील रहिवासी होता. त्याचं नाव नवीन शेखरप्पा असल्याचे समोर आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.
दरम्यान, युक्रेनमधील संघर्ष अधिकच तीव्र झाल्याने तिथे अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच युक्रेनमधील भारतीय दुतावासाकडून तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडूनही युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना खारकिव्ह आणि किव्ह ही शहरे तातडीने सोडण्याची सूचना दिली जात आहे.