Russia Ukraine War: युक्रेनमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; ब्रेन हॅमरेजमुळे निधन, वडीलही अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 08:07 PM2022-03-02T20:07:06+5:302022-03-02T20:10:37+5:30
युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला
नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशिया अधिकच आक्रमक होत आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह दोन दिवसांपासून धोकादायक शहर बनले आहे. त्यातच, मंगळवारी रशियन सैन्याच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याला जीव गमावाला लागल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर, देशभरात संताप व्यक्त होत आहे. आता आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून कोमात असलेल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने, युद्ध परिस्थितीमुळे तेथील इतर विद्यार्थी भयभीत झाले आहेत.
युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. पंजाबच्या बरनाला येथील रहिवाशी असलेल्या चंदन जिंदल अशी ओळक या विद्यार्थ्याची समोर आली आहे. बरनालाचे प्रसिद्ध समाजसेवक शीसन कुमार जिंदल यांचा तो मुलगा असून तो 2018 पासून युक्रेन येथे शिक्षणानिमित्त राहत होता. नॅशनल पिरोगोव मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीत चंदन एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. चंदनला 2 फेब्रुवारी रोजी अचानक हर्टअॅटक आल्याने तो कोमात गेला. त्यावेळी, 4 फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी त्याचे तात्काळ ऑपरेशनही केले होते.
चंदनचे 2 मार्च म्हणजे आज निधन झाले, आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी त्याचे वडिल 7 फेब्रुवारी रोजी भावासह युक्रेनला गेले होते. युक्रेन-रशियातील युद्धजन्य परिस्थितीत अचानक युद्धही सुरू झाले. त्यामुळे, चंदनचे वडिल आणि काकाही तेथेच अडकून पडले होते. 1 मार्च रोजी चंदनचे काका कृष्णकुमार जिंदल विमानाने भारतात परतले. तर, मुलावर उपचार सुरू असल्याने शीशन कुमार जिंदाल हे तेथेच थांबले. मात्र, दुर्दैवाने चंदनने आज अखेरचा श्वास घेतला.
आपल्या मुलाच्या निधनाची बातमी समजताच चंदनची आई आणि बहिण यांना दु:ख अनावर झाले होते. चंदनच्या घरी लोकं, नातेवाईक जमा होऊ लागले. मात्र, चंदन आता आपल्यात नाही, ते वृत्त त्यांना न पचणारे होते. युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू असल्याने तेथील विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यातच, चंदनच्या निधनामुळेही अनेक विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
हल्ल्यात 21 वर्षीय नवीनचा मृत्यू
रशियन सैन्यानेखारकीववर हल्ला चढवला. अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला. खारकीवमधील सरकारी इमारत रशियाच्या हल्ल्यात अवघ्या काही क्षणांत जमीनदोस्त झाली. दरम्यान, युक्रेनमधील खारकीव येथील गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव असून, तो अवघ्या 21 वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता.