नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) भारताच्या लसीकरण मोहिमेवरही परिणाम होत आहे आणि त्याच्या फटका जागतिक कोरोना लसीकरण (Global Corona Vaccination)कार्यक्रमावरही बसू शकतो. कारण भारत हा जगातील सर्वात मोठा औषध उत्पादक देश आहे. भारतातूनच परदेशातही मोठ्या प्रमाणात कोरोना लसींचा पुरवठा केला जात आहे.
वृत्तानुसार, रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी रशियन संस्था आणि उद्योगांवर आतापर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लादले आहेत. जवळपास दररोज नवीन निर्बंध जाहीर केले जात आहेत. रशियाच्या बँका, गुंतवणूक, भांडवल आणि इंटरनॅशनल पेमेंट सिस्टम (SWIFT) मधील सहभाग या सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सहा दिवसांत रशियाची अर्थव्यवस्था चांगलीच हादरली आहे.
याचा परिणाम रशियाच्या स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) लसीच्या उत्पादनावरही झाला आहे, जी भारतात मोठ्या प्रमाणावर बनवली जात आहे. दरम्यान, सीएनएन-टीव्ही 15 ला दिलेल्या माहितीनुसार, फार्मास्युटिकल उद्योगातील उच्च-स्तरीय सूत्रांनी याची पुष्टी केली. त्यांच्या मते, येत्या काही दिवसांत भारतात या लसीचे उत्पादनही थांबू शकते.
रशियाशिवाय स्पुतनिक-व्ही (Sputnik-V) ही लस भारतात जास्तीत जास्त प्रमाणात बनवली जात आहे. भारतात ही लस कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत खाजगी स्तरावर दिली जात आहे. यासह, जगातील सुमारे 71 देशांमध्ये ते पाठवले जात आहे, जेथे लसीकरणासाठी त्याचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या देशांतील सुमारे 4 अब्ज लोकांना आतापर्यंत या लसीचा फायदा होत आहे.
दरम्यान, यावर आता संशयाचे ढग दाटले आहेत, कारण या लसीचे मार्केटिंग करणारी संस्था रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF), जागतिक आर्थिक निर्बंधांमुळे अडचणीत आली आहे. RDIF ची स्थापना 2011 मध्ये झाली. जगातील अनेक मोठ्या वित्तीय संस्था आणि बँकांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे.