नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाला आता आठवडा उलटला आहे. यादरम्यान, भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी हवाई दलाचीही मदत घेतली जात आहे. दरम्यान भारत सरकारने रशियासोबत एक महत्त्वपूर्ण करार केला आहे. खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचे पराराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना खारकीव्ह येथून बाहेर काढत युक्रेनशेजारील देशांच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे युद्ध 6 तास थांबविण्यात आल्याचे वृत्त होते. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादीमीर पुतीन यांची चर्चा झाल्याचेही या वृत्तात म्हटले होते. मात्र, रशियाने 6 तास युद्ध थांबवल्याचे वृत्त निराधार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
''आम्हालाही काही मीडिया रिपोर्ट्समधून हे वृत्त समोर आले. मात्र, ते निराधार आहे. आपल्या सांगण्यावरुन युद्ध थांबवले असे म्हटले तर, पुन्हा आपल्याच सांगण्यावरुन बॉम्बहल्ले सुरू केले, असेच म्हणावे लागेल. मात्र, याबाबत मी अधिक टिपण्णी करू इच्छित नाही,'' असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. भारत सरकारकडून खारकीव्ह आणि सूमी येथून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही युक्रेन आणि रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आमच्या अंदाजानुसार आपल्या कसोशीच्या प्रयत्नानंतरही अद्याप 100 भारतीय कारकीव्हमध्ये आहेत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
काय होते युद्ध थांबवल्याचे निराधार व्हायरल वृत्त
युक्रेनच्या खारकीव्ह शहरामध्ये अद्यापही शेकडो विद्यार्थी अडकलेले आहेत, अशी माहिती मिळत आहे. भारतीयांना तिथून बाहेर पडू दिले जात नाही आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी पुतीन यांनी या विद्यार्थ्यांना बाहेर आणण्यासाठी रशिया भारताला मदत करेल, असे सांगितले होते. दरम्यान, खारकिव्हमध्ये युक्रेनच्या सैन्याकडून भारतीय विद्यार्थ्यांचा वापर मानवी ढालीसारखा केला जात असल्याचा दावा केला जात आहे.
व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांना युद्धक्षेत्रातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक आदेश देण्यात आले आहेत. रशियन सैन्य याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्यांनी सांगितले की, रशियन सैन्याकडून खारकिव्हपासून रशियापर्यंत एक सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात येण्याबाबत संकेत दिले होते. त्याच्याच पुढच्या दिवशी रशिया सहा तास युद्ध थांबवण्यासही तयार झाला आहे. दरम्यान, भारतीय दूतावासाने बुधवारी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने खारकिव्ह सोडण्याची सूचना दिली होती.