नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील अनेक शहरे होरपळून निघत आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी चिंतीत कुटुंबीयांकडून सरकारकडे विनंती करण्यात येत आहे. तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी कुटुंबीय दिवसरात्र टीव्हीवर नजर ठेवून आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशमधील गौना गावातील एक विद्यार्थिनी युक्रेनमध्ये अडकली आहे. त्याचवेळी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याचे वृत्त समजताच तिच्या आजोबांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गौना येथील पायल युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तिचे आजोबा रत्न चंद टीव्हीवर युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीबाबतचे वृत्तांकन पाहत होते. तेव्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांचं निधन झालं.
रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू असून, पुतीन यांच्या आदेशानंतर रशयाच सैन्य युक्रेनमध्ये घुसले आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हपर्यंत रशियन सैन्याने धडक दिली आहे. यादरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये रशियाविरोधात आणलेला निषेधाचा प्रस्ताव बारगळला आहे. या प्रस्तावाविरोधात रशियाने व्हेटो वापरला. तर चीनने तटस्थ भूमिका घेतली. भारतानेही या प्रस्तावाबाबत तटस्थ भूमिका घेतली.