युक्रेनच्या सैन्याने रशियन रणगाड्यांना अशाप्रकारे उध्वस्त केलेय की रशियन फौजांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. युक्रेन आज ताब्यात घेऊ, उद्या ताब्यात घेऊ म्हणणाऱ्या रशियाला आज ४६ दिवस झाले तरी विजय घोषित करता आलेला नाही. उलट ताब्यात आलेले प्रदेश सोडावे लागत आहेत. या साऱ्या घडामोडींमुळे भारतीय सैन्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
या युद्धावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहे. या युद्धातून शहाणे होत भारतीय सैन्य आपल्या रणगाड्यांमध्ये बदल करणार आहे. भारताकडे रशियासारखेच रणगाडे आहेत. यामुळे जमिनीवरील युद्धाचा धोका असलेल्या भारताला पाकिस्तान, चीनकडून मोठा धोका आहे. यामुळे रशियाच्या अवस्थेचा अभ्यास करून भारतीय सैन्य पुढील काळात आपल्या रणगाड्यांमध्ये बदल करणार आहे.
युक्रेनला रशियाच्या रणगाड्यांना उडविण्यात खूप मोठे यश मिळाले आहे. रशियाच्या या वाहनांमध्ये काही त्रूटी होत्या, त्यामुळे ती सहज लक्ष्य ठरली असे यावरून दिसत आहे. युक्रेनने याचाच फायदा उठवत अँटी टँक गायडेड मिसाईचा तुफान वापर केला आहे. ही क्षेपणास्त्रे अमेरिकेची आणि युरोपीय देशांची जरी असली तरी आपण तयार राहिलेले चांगले असा विचार भारताने केला आहे.
युद्धभूमी बनलेल्या युक्रेनमधील प्रत्येक घडामोडींवर भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर आणि अधिकारी लक्ष ठेवून आहेत, कारण तेथील लढाईत वापरल्या जाणार्या रणगाड्यांसह अनेक युद्धसामुग्री भारताशी साधर्म्य साधणारी आहे. तेथून मिळणाऱ्या माहितीचे गांभीर्याने विश्लेषण केले जात आहे. सरकारी सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, येत्या काही वर्षांत भारतीय सैन्याला मिळणाऱ्या रणगाड्यांमध्ये युक्रेन-रशिया युद्धातील इनपुट्स वापरून बदल केले जातील.
भारत का चिंतेत...T-90, T-72 आणि BMP मालिकेतील रणगाड्यांसह रशियन आर्मर्ड वाहने भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. भारतीय लष्कराने यापूर्वी हे रणगाडे वाळवंट आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केले होते, परंतु आता ते चीनच्या सीमेवरही तैनात आहेत. लडाखपासून सिक्कीमपर्यंत हे रणगाडे मोठ्या संख्येने भारताच्या सीमांचे रक्षण करत आहेत. असे असताना भारतीय सैन्याला रशियाची हे रणगाडे अपयशी ठरले तर आपल्याला त्याचा फटका बसेल असे वाटत आहे.