युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने युक्रेन सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. युक्रेनच्या आजुबाजुच्या चार देशांत या विद्यार्थ्यांना नेण्यात येत आहे. या देशांत पोलंड आघाडीवर आहे. जवळपास आठ दशकांपूर्वी भारतातील एका महाराजांनी पोलंडची पुढची पिढी सांभाळली होती. दुसऱ्या महायुद्धात पोलंडवर रशियाने आक्रमण केले होते. हजारो लोक मारले गेले होते. तेव्हाच्या उपकारांची परतफेड पोलंड आज करत आहे.
तेव्हाच्या नवानगर आणि आताच्या जामनगरचे राजा दिग्विजय सिंहजी जडेजा यांनी पोलंडमध्ये युद्धात अनाथ झालेल्या हजारावर मुलांना पालकत्व दिले होते. त्यांना ब्रिटिशांच्या मदतीने त्यांनी या मुलांना भर युद्धात जामनगरला आणले होते. त्यांना लहानाचे मोठे केले. यासाठी एकही रुपया त्यांनी पोलंड सरकारकडून घेतले नाहीत. पोलंडहून एक फुटबॉल प्रशिक्षक पाठविण्यात आला होता. तसेच त्यांची पोलंडशी नाळ तुटू नये म्हणून पोलिश पुस्तकांची लायब्ररी उघडली होती.
दिग्विजय सिंहजी जडेजा यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा पोलंडच्या सरकारने त्यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरिक सम्मान कमांडर्स क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान करण्यात आला. एवढेच नाही तर पोलंडमध्ये उद्यान, रस्ते, शाळांनाही महाराजांचे नाव देण्यात आले आहे.
काय घडलेले तेव्हा...दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने सोव्हिएत संघाशी हातमिळवणी केली होती. 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर हल्ला केला, त्यानंतर १६ दिवसांतच रशियानेही हल्ला केला. यामुळे पोलंडवर दुहेरी संकट कोसळले होते. हजारो सैनिक मारले गेले होते. हजारो मुले अनाथ झाली होती. या मुलांना सैनिकी कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. परंतू दोन वर्षांनी रशियाने हे कॅम्प रिकामे करण्याचे आदेश दिले. तेव्हा या मुलांना कुठे हलवावे, या विषयावर ब्रिटनमध्ये वॉर कैबिनेटची बैठक झाली. या बैठकीला महाराजा उपस्थित होते. युरोप दुसऱ्या महायुद्धात पेटलेला. मुलांना बाहेर पाठवावे लागणार होते. तेव्हा राजांनी कोणताही विचार न करता तयारी दाखविली. ब्रिटिश सरकारनेही मान्यता दिली आणि त्यासाठी तयारी सुरु करण्यास सांगितले. सुरुवातीला १८० मुले जामनगरला आणण्यात आली. महाराजांनी बालाचाड़ी हे गाव या मुलांसाठी दिले.
तेव्हा महाराजा दिग्विजय सिंहांनी पोलंड सरकारला एक शब्द दिला होता. तुमची मुले माझी संपत्ती आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना तुम्ही मायदेशी घेऊन जाऊ शकता. 1945 ला महायुद्ध संपल्यावर पोलंड सोव्हिएत संघात विलिन झाले. तेव्हा पोलंडच्या सरकारने मुलांना मायदेशी नेली. 1966 ला महाराजांचे निधन झाले. सोव्हिएतपासून पोलंड 1989 ला स्वतंत्र झाले. महाराजांच्या उपकारांना ४३ वर्षे उलटून गेली होती. पोलंड हे उपकार विसरले नव्हते. त्यांनी चौक, शाळा आणि उद्यानाला महाराजांचे नाव दिले. ही मुले त्यांच्या वृद्धापकाळात २०१३ मध्ये जामनगरला आली होती.