Russia Ukraine War: चिनी सैन्य भारतात घुसले तर...; विश्वासघातकी अमेरिकेने भारताला दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 10:53 AM2022-04-01T10:53:57+5:302022-04-01T10:54:14+5:30
US Deputy NSA Daleep Singh on India Visit: रशियावर निर्बंध लादण्याची आणि ते कार्यरत करण्याची जबाबदारी अमेरिकेने दलीप सिंह यांच्यावर दिली आहे. त्यांनी चीन आणि रशियामध्ये नो लिमिट्स पार्टनरशीप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बांग्लादेश मुक्ती संग्रामावेळी भारतावर हल्ला करण्यासाठी चाल करून येणाऱ्या अमेरिकेने रशियाची साथ सोडण्यासाठी आता माईंड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने भारतावर तेव्हा जपानमध्ये तैनात असलेल्या युद्धनौकांमधून सैनिक पाठविले होते. तेव्हा रशियाच भारताच्या मदतीला धावून आला होता. युएनमध्ये अमेरिकेविरोधात जातानाच आपल्या युद्धनौका भारताच्या मदतीला पाठविल्या होत्या. आज अमेरिकेने रशिया भारताच्या मदतीला येणार नाही, असे म्हटले आहे.
युक्रेन-रशिया युद्धामुळे अमेरिकेने रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. युद्धा सुरु होऊन एक महिना झाला तरी या निर्बंधांचा काहीएक फरक पडताना दिसत नाहीय. रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्यास अमेरिकेला अपय़श येत आहे. रशियाचे गहू आणि कच्चे तेल या दोन जमेच्या बाजू आहेत. रशिया आपल्या मित्रदेशांना कमी किंमतीत कच्चे तेल देणार आहे. यामुळे भारत हे तेल खरेदी करेल आणि रशियावरील आपली कारवाई फोल ठरेल अशी भीती अमेरिकेला आहे.
महत्वाचे म्हणजे रशियाच्या मदतीला चीनदेखील आला आहे. चीनने रशियाचे गहू खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे अनिवासी भारतीय उप एनएसए दलीप सिंह हे भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी असे वक्तव्य केले आहे, जे भारताला चीड आणणारे आहे. चीनने जर एलएसीवर हल्ला केला, भारतात घुसला तर रशिया आपल्याला मदत करेल या अपेक्षेवर भारताने राहू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
रशियावर निर्बंध लादण्याची आणि ते कार्यरत करण्याची जबाबदारी अमेरिकेने दलीप सिंह यांच्यावर दिली आहे. त्यांनी चीन आणि रशियामध्ये नो लिमिट्स पार्टनरशीप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे रशिया तेव्हा भारताला मदत करेल हे सांगू शकत नाही, असे ते म्हणाले. त्यांनी पत्रकार परिषदेत रशियाला मदत करणाऱ्या देशांना थेट धमकी दिली आहे. रशियावरील निर्बंध न पाळणाऱ्या देशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले. परंतू अमेरिका आणि भारतामध्ये कोणतीही लाल रेषा आखलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.