चेन्नई: रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्राकडून 'ऑपरेशन गंगा'(Operation Ganga) चालवले जात आहे. याअंतर्गत युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या पाचव्या वर्षात शिकत असलेली एक तरुमी भारतात परतली. विशेष म्हणजे, ती एकटी आली नाही, तर सोबत आपल्या पाळीव कुत्रा 'कँडी' यालाही घेऊन आली.
कँडीसाठी सामान सोडलेयुद्धग्रस्त परिस्थितीत अनेक अडथळ्यांवर मात करुन भारतीय तरुणी कीर्तना अखेर भारतात परतली. शनिवारी तिचे विमान चेन्नईत लँड झाले. ती युक्रेनमधून एकटी आली नाही, तर येताना आपल्या पाळीव 'कॅंडी'ला घेऊन आली. कीर्तनाला तिच्या पाळीव कुत्र्याला मागे सोडायचे नव्हते. सुरुवातीला कुत्र्याला भारतात आणण्यात अनेक अडचणी येत होत्या. पण, आपले सामान आणि चार विमाने सोडल्यानंतर शेवटी तिला कुत्र्यासह येण्याची परवानगी मिळाली.
अखेर भारतीय दूतावासाने दिली परवानगीसुरुवातीला कीर्तनाने चार वेळा विशेष विमानाने परतण्यास नकार दिला. पण, शेवटी भारतीय दूतावासाने पेकिंगिज जातीच्या या कुत्र्याला घेऊन उड्डाण करण्याची परवानगी दिल्यावर कीर्तना विमानात चढली. कीर्तना शनिवारी 'कॅंडी'ला घेऊन चेन्नई विमानतळावर पोहोचली. यावेळी कुटुंबीयांनी तिचे स्वागत केले. कीर्तना तामिळनाडूतील मायिलादुथुराई येथील असून ती युक्रेनमधील उझहोरोड नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती.