Russia Ukraine War: युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, अवघं २१ वर्षे वय, कर्नाटकमधील होता रहिवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 03:41 PM2022-03-01T15:41:00+5:302022-03-01T15:55:16+5:30
Russia Ukraine War: खारकिव्हमध्ये रशियाने केलेल्या भीषण बॉम्बहल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
किव्ह - रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष आता भयानक वळणावर आला आहे. दरम्यान, या युद्धामध्ये युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले भारतीयविद्यार्थीही भरडले जात आहेत. त्यातच खारकिव्हमध्ये रशियाने केलेल्या भीषण बॉम्बहल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
या विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. आज सकाळपासून रशियाने युक्रेनमधील सर्व मोठ्या शहरांवर तीव्र हल्ले केले आहे. अरिंदम बागची यांनी सांगितले की, दु:खद अंत:करणाने सांगावे लागत आहे की, खारकीव्हमध्ये जे हवाई हल्ले करण्यात आले त्यात एका भारती विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सध्या परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. त्याच्या कुटुंबीयांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो.
With profound sorrow we confirm that an Indian student lost his life in shelling in Kharkiv this morning. The Ministry is in touch with his family.
— Arindam Bagchi (@MEAIndia) March 1, 2022
We convey our deepest condolences to the family.
दरम्यान, टीव्हीवर येत असलेल्या वृत्तानुसार हा विद्यार्थी कर्नाटकमधील रहिवासी होता. त्याचं नाव नवीन शेखरप्पा ज्ञानगौदर असल्याचे समोर आले आहे. अरविंद बागची यांनी सांगितले की, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रशिया आणि युक्रेनच्या राजदुतांच्या संपर्कात आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग देण्याची मागणी करण्यात आली आहे. अद्यापही अनेक भारतीय विद्यार्थी खारकिव्ह आणि अन्य शहरांमध्ये अडकलेले आहेत.