रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील डायमंड सिटीची चमक हरवली; 20 लाख लोकांच्या नोकरीवर संकट...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 05:50 PM2022-06-26T17:50:48+5:302022-06-26T17:52:00+5:30
Russia-Ukraine War: तापी नदीच्या मुखाशी असलेले हे शहर मुळात बंदर शहर म्हणून वसले होते, परंतु स्वातंत्र्यानंतर 60 आणि 70 च्या दशकात या शहराला डायमंड सिटीचा दर्जा मिळाला.
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जगात बऱ्याच महागल्या आहेत. गव्हापासून ते कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पण भारतामध्ये असे एक शहरदेखील आहे, ज्याची 'हिऱ्या'सारखी चमक या युद्धामुळे हरवत चालली आहे. याचा परिणाम म्हणजे या शहरात काम करणाऱ्या सुमारे 20 लाख लोकांवर उदरनिर्वाहाचे संकट निर्माण झाले आहे.
सुरतच्या 'हिरे उद्योगा'ची अवस्था वाईट
आम्ही भारताच्या सुरतमधील डायमंड सिटीबद्दल बोलत आहोत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे या शहरात हिरे पॉलिशिंगच्या कामात गुंतलेल्या सुमारे 20 लाख हिरे कारागिरांच्या रोजीरोटीचे संकट निर्माण झाले आहे. एएफपीने आपल्या एका वृत्तात अशा अनेक मजुरांची शोकांतिका सांगितली आहे. सुरतच्या स्थानिक कामगार संघटनेच्या अंदाजानुसार सुरतमध्ये आतापर्यंत 30,000 ते 50,000 हिरे कारागिरांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. तर या कामावर अवलंबून असलेल्यांची संख्या 15 ते 20 लाखांपर्यंत आहे.
रशिया रत्नांचा सर्वात मोठा पुरवठादार
सुरतमधील या संकटाचे कारण म्हणजे रशियावर लादलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंध. या निर्बंधांमुळे भारताला रशियाकडून हिरे आणि इतर अनेक गोष्टी आयात करणे कठीण झाले आहे. रशिया हा भारताचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. सुरतचे व्यापारी सुमारे 27 टक्के रफ हिरे रशियाकडून आयात करतात. पण, आता युद्धामुळे यावर मोठा परिणाम होत आहे.
60 च्या दशकात बांधली डायमंड सिटी
पोर्तुगीजांच्या काळात सुरतला मोठी ओळख मिळाली. तापी नदीच्या मुखाशी असलेले हे शहर मुळात बंदर शहर म्हणून वसले होते, परंतु स्वातंत्र्यानंतर 60 आणि 70 च्या दशकात या शहराला डायमंड सिटीचा दर्जा मिळाला. जगातील 90% हिरे सुरतमध्येच कापले जातात आणि पॉलिश केले जातात. सूरत हे कपड्यांच्या घाऊक व्यापाराचेही मोठे केंद्र आहे.