Russia-Ukraine War: कधी पुतीन यांच्या मागे हातावर हात धरून उभे राहिलेले मोदी; आज जुना फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 11:47 AM2022-03-07T11:47:26+5:302022-03-07T11:47:53+5:30
Narendra Modi's old Photo with Vladimir Putin: हा फोटो २०१९ मध्ये मोदींनीच पोस्ट केला होता. मोदी मुख्यमंत्री असतानाचा तो फोटो आहे.
एखाद्या व्यक्तीचे दिवस कसे पलटतील याचा नेम नाही. कोण रंकाचा राव, तर कोण कधी रावाचा रंक होईल सांगता येत नाही. गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ते किती साधे होते, हातात काहीही नसताना कसे गुजरातचे मुख्यमंत्री झाले वगैरे वगैरे, परंतू कधी एके काळी पुतीन यांच्या पाठीमागे मोदी आपल्या पाठीवर हातावर हात घेऊन उभे असलेला फोटो आता व्हायरल होऊ लागला आहे. हा फोटोही खरा आहे.
हा फोटो २०१९ मध्ये मोदींनीच पोस्ट केला होता. दोन दशकांपूर्वी वाजपेयींचे सरकार होते. नोव्हेंबर २००१ मध्ये माजी पंतप्रधान वाजपेयी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा तेव्हाचे गुजरात मुख्यमंत्री म्हणून मोदी देखील वाजपेयींसोबत गेले होते. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची वाजपेयींनी भेट घेतली.
गुजरातमध्ये प्रकल्पासाठी पुतीन यांच्यासोबत करार होणार होता. या करारासाठी मोदींची सही लागणार होती. त्यासाठी मोदी वाजपेयींसोबत गेले होते. तेव्हा पुतीन यांना देखील वाटले नव्हते की हा माणूस पुढे १५ वर्षांनी याच देशाचा पंतप्रधान होईल. मोदी, पुतीन आणि मध्ये वाजपेयी असे एका टेबलवर बसले आणि मोदींनी करारावर सही केली.
त्या आधी रशियासोबतच्या अन्य करारांवर वाजपेयी आणि पुतीन हे चर्चा आणि सही करत होते. तेव्हा मोदी या दोघांच्या मागे रांगेत पाठीमागे हातावर हात घेऊन उभे होते. आज मोदी पुतीन यांना युक्रेन युद्धाबाबत बोलण्यासाठी फोन करणार आहेत. हे अंतर पार करण्यासाठी मोदी यांना पंधरा वर्षे लागली. हे दाखविणारा हा फोटो आज व्हायरल होऊ लागला आहे.