Russia Ukraine War: आता रशियासोबत शांतता वार्ता नाही, प्रत्युत्तर देणार, युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:34 AM2022-04-06T07:34:47+5:302022-04-06T07:35:36+5:30
Russia Ukraine War: लष्करी मदत वेळेत मिळाली असती तर हजाराे लाेकांचे प्राण आम्ही वाचवू शकलाे असताे, अशा शब्दांमध्ये जेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली. हा नरसंहार पाहून आता शांतता चर्चा हाेण्याची शक्यता कमी असून, युक्रेन या हत्यांचा बदला जरूर घेईल, असा इशारा जेलेन्स्की यांनी दिला.
कीव्ह/माॅस्काे : युक्रेनच्या बुका शहरात रशियन सैन्याने केलेल्या भीषण नरसंहाराचे खापर राष्ट्रपती वाेलाेदिमीर जेलेन्स्की यांनी पाश्चिमात्य देशांवर फाेडले आहे. लष्करी मदत वेळेत मिळाली असती तर हजाराे लाेकांचे प्राण आम्ही वाचवू शकलाे असताे, अशा शब्दांमध्ये जेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली. हा नरसंहार पाहून आता शांतता चर्चा हाेण्याची शक्यता कमी असून, युक्रेन या हत्यांचा बदला जरूर घेईल, असा इशारा जेलेन्स्की यांनी दिला.
रशियन सैन्याने सुमी व इतर शहरांमध्येही अशाच प्रकारे नरसंहार केल्याचे समाेर आले आहे. बुका शहरात दाखल झालेले जेलेन्स्की यांनी हा नरसंहार पाहून संताप व्यक्त केला. रशियाचे क्राैर्य पाहून त्यांनी शांतता चर्चा हाेण्याची शक्यता फेटाळली. ते म्हणाले, की युक्रेन रशियाला जाेरदार प्रत्युत्तर देणार असून, दृढ संकल्पाने प्रतिहल्ले करील. पाश्चिमात्य देशांनी आधीच लष्करी मदत केली असती तर हजाराे जणांचे प्राण वाचले असते.
फ्रान्स, जर्मनीवर डागली तोफ
- जेलेन्स्की यांनी फ्रान्स आणि जर्मनीच्या नेत्यांवर ताेफ डागली. एका व्हिडिओ संदेशामध्ये ते म्हणाले, की या नेत्यांनी बुकामध्ये येऊन रशियन अत्याचाराचे चित्र पाहावे.
- गेल्या १५ वर्षांमध्ये त्यांच्या रशियासाठी पाेषक धाेरणांमुळे काय झाले, हेदेखील पाहावे.
- युक्रेनला नाटाेचे सदस्यत्व न देण्याची भूमिका फ्रान्स आणि जर्मनीने घेतली आहे. मात्र, यामुळे रशियालाच फायदा हाेत असल्याचे जेलेन्स्की म्हणाले.
रशियाची डाेनबासवर हल्ल्याची तयारी
शांतता चर्चा सुरू झाल्यानंतर कीव्ह शहरातून माघार घेणारे रशियन सैन्य पुन्हा एकत्र येत असून, त्यांची डाेनबासवर हल्ल्याची तयारी असल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे.
त्यांच्या माहितीनुसार, डाेनेत्स्क आणि लुहान्स्क या प्रांतांवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी सैन्याने तयारी सुरू केली
आहे.
मारियुपाेलवर पूर्ण नियंत्रण मिळविण्याचे रशियाचे प्रयत्न आहेत.
याशिवाय पोपासना आणि रुबिइने या शहरांना ताब्यात घेण्याचा रशियाचा इरादा आहे. या प्रांतांना रशियाने स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे.