Russia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी(दि.20 मार्च) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी मोदींनी रशिया-युक्रेन (Russia-Ukraine War) संघर्ष लवकर संपवण्यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच, भारत युक्रेनला मानवतावादी मदत देणे सुरुच ठेवेल, असेही पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांना सांगितले.
पीएम मोदींनी 'X' वरील पोस्टद्वारे सांगितले की, “भारत-युक्रेन संबंध अधिक मजबूत करण्यावर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चांगली चर्चा झाली. सर्व शांतता प्रयत्नांना भारताचा सतत पाठिंबा आणि चालू संघर्ष लवकर संपवण्याचा संदेश दिला. भारत युक्रेनला मानवतावादी मदत पुरवत राहील." राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही भारताचे मानवतावादी मदतीसाठी आभार मानले. चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रात भारत-युक्रेन भागीदारी आणखी मजबूत करण्यावरही चर्चा केली.
पुतिन यांच्याशीही चर्चा:-
दरम्यान, झेलेन्स्की यांच्याशी बोलण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी दुपारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनाही फोन करुन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच, रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या दोन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध कसे थांबवता येईल, याबाबत सल्ला दिला. चर्चा आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाने युद्धावर तोडगा काढता येईल, असे मोदींनी सांगितले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले आहेत. त्याबाबत मोदींनी पुतीन यांचे अभिनंदन केले. तसेच रशियाची प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी येणाऱ्या वर्षांमध्ये दोन्ही देशांदरम्यान, रणनीतिक भागीदारी अधिक भक्कम करण्याच्या दिशेने प्रभावी पावले उचलण्याबाबतही सहमती दर्शवली.