Narendra Modi: PM मोदींनी युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची घेतली भेट, मुलांनी ऐकवली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 06:26 PM2022-03-03T18:26:44+5:302022-03-03T18:27:02+5:30
Russia-Ukraine: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनच्या शेजारील रुमानिया, हंगेरी आणि पोलंड या देशांमधून भारतीयांना परत आणले जात आहे.
वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी प्रचार करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज वाराणसीला पोहोचण्यापूर्वी मोदींनी चंदौली आणि जौनपूरमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित केले. तसेच, वाराणसीमध्ये युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची भेटही घेतली. यावेळी मायदेशात परतलेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना आपले अनुभव सांगितले. पंतप्रधानांना भेटलेले हे विद्यार्थी वाराणसी आणि उत्तर प्रदेशातील इतर भागातील होते.
विद्यार्थ्यांनी सांगितला अनुभव
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी वाराणसीला पोहोचले. येथे त्यांनी वाराणसी आणि उत्तर प्रदेशातील विविध भागातील आणि युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या शेजारी रुमानिया, हंगेरी आणि पोलंड या देशांद्वारे भारत युद्धग्रस्त देशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणत आहे.
Prime Minister Narendra Modi interacted with students who returned from Ukraine in Varanasi today. These students shared their experiences with him. The students were from Varanasi as well as other parts of Uttar Pradesh. pic.twitter.com/iHpACjgAqf
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 3, 2022
केंद्रीय मंत्र्यांकडे मोठी जबाबदारी
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना स्लोव्हाकिया, ज्योतिरादित्य सिंधिया यांना रोमानिया, हरदीप पुरी यांना हंगेरी आणि व्हीके सिंग यांना पोलंडला विशेष दूत म्हणून पाठवण्यात आले आहे. त्यांना भारतीयांच्या निर्वासन मोहिमेचे समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
आतापर्यंत 17000 भारतीय युक्रेनमधून मायदेशात परतले
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे(Russia-Ukraine War) हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'(Operation Ganga) सुरू केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत हजारो भारतीयांना परत आणण्यात आले असून, आजही युक्रेनमधून 3726 भारतीय परतणार आहेत. कीवमधील भारतीय दूतावासाने अॅडव्हायजरी जारी केल्यापासून आतापर्यंत एकूण 17,000 भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे.