नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन यांच्यातील युद्धाला ५ दिवस उलटले. आजही यूक्रेनच्या अनेक शहरांत स्फोटांचे आवाज कानी पडत आहेत. यूक्रेनचं सैन्य बलाढ्य रशियासमोर झुकण्यास तयार नाही. यूक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशिया आक्रमक हल्ला करत आहे. मात्र यूक्रेनचे सैन्यही देशाचं संरक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. त्यात आता सर्वसामान्य नागरिकही युद्धात उतरला आहे.
यूक्रेनच्या अशा वातावरणात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांमुळे पालकांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत ऑपरेशन गंगा अंतर्गत यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणलं जात आहे. परंतु अजूनही बरेच विद्यार्थी त्याठिकाणी दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी(Congress Rahul Gandhi) यांनी भारत सरकारकडे लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींनी ट्विट करुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात विद्यार्थ्यांसोबत हिंसाचार आणि मारहाण होत असल्याचं दिसत आहे.
राहुल गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, ज्यारितीने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ,फोटो येत आहेत ते पाहून मला त्यांच्या पालकांची चिंता समजू शकते. असे व्हिडीओ पाहून हिंसा सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वेदना होत असतील. कुठल्याही पालकांवर अशी वेळ येऊ नये. भारत सरकारने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी तात्काळ मिशन हाती घेतले पाहिजे. आपल्या मुलांना अशारितीने सोडू शकत नाही असं त्यांनी सांगितले.
याआधी राहुल गांधींनी कर्नाटकातील काही विद्यार्थ्यांचा व्हिडीओ शेअर केला होता. ते विद्यार्थी यूक्रेनमध्ये बंकरमध्ये अडकले होते. बंकरमधील स्थिती विदारक होती. ज्याठिकाणी हल्ला झालाय त्या पूर्व यूक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकलेत. या विद्यार्थ्यांना तातडीनं मायदेशी आणलं पाहिजे असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाने यूक्रेनमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. त्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केलेत.
सोमवारी सकाळी एअर इंडियाचं विमान ६.३० च्या सुमारास रोमानियाची राजधानी बुखारेस्टहून दिल्लीला पोहचलं. त्यात २४९ विद्यार्थी होते. गेल्या ३ दिवसांपासून आतापर्यत ही पाचवी फ्लाईट आहे. ३ दिवसांत आतापर्यंत १ हजार १५६ भारतीयांना यूक्रेनमधून परत आणलं आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर यूक्रेनमधील स्थिती बिघडत चालली आहे. भारतासह अनेक देशातील नागरिक त्याठिकाणी अडकले आहेत. प्रत्येक देश आपापल्या परिने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागील २ दिवसांपासून यूक्रेनची राजधानी कीववर रशिया हल्ला करत आहे. रशिया-यूक्रेनमधील युद्ध रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहेत.