नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. हे युद्ध वाढले तर संपूर्ण जगच संकटात येऊ शकते, अशी भीती जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे. कारण, मग इतर देशही या युद्धात सामील होऊ शकतात. दरम्यान, भारतासह इतर देशातील लोकही हे संकट संपावे यासाठी प्रार्थना करत आहेत. युक्रेनच्या भारतातील राजदूताने तर, भारतात उपस्थित असलेल्या शिवभक्तांनी हे युद्ध संपण्यासाठी भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करावी, असे आवाहन केले आहे.
नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी हे आवाहन केले आहे, याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. यात ते म्हणत आहेत, आज भारतात महाशिवरात्रीचा उत्सव आहे. माझे आवाहन आहे की, आपण सर्वांनी या युद्धाच्या समाप्तीसाठी भगवान शिव यांच्याकडे प्रार्थना करावी. जेणेकरून युक्रेनचे लोक या संकटातून बाहेर पडू शकतील.
इगोर पोलिखा यांनी युक्रेनमधील स्थितीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी भारतातील शिव भक्तांना आवाहन केले. युक्रेनमध्ये रोज रात्री गोळीबार सुरू आहे. सर्व बाजूंनी गोळीबार सुरू आहे. लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनमध्ये अशी परिस्थिती निर्माण होणे, ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.