5 गोळ्या लागल्या पण 'तो' हिंमत नाही हारला; युक्रेनहून परतल्यावर सांगितली थरकाप उडवणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 04:09 PM2022-03-29T16:09:51+5:302022-03-29T16:12:34+5:30
Russia Ukraine War And Harjot Singh : हरजोत म्हणाला, पहिली गोळी लागली तेव्हा असं वाटलं की आता जीव जाईल. पण दुसरी गोळी लागल्यावर धीर आला आणि मनात ठरवलं की आता काहीही झालं तरी बाहेर पडायचंच.
नवी दिल्ली - युक्रेनमध्ये गोळी लागल्याने जखमी झालेला हरजोत (Harjot Singh) आता भारतात आल्यानंतर आपल्या घरी परतला आहे. हरजोत 7 मार्च रोजी युक्रेनमधून भारतात परतला, त्यानंतर त्याला लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता तो उपचारानंतर आपल्या घरी पोहोचला आहे. तब्बल 21 दिवसांनी त्याला आर्मी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 27 फेब्रुवारीची घटना आठवल्य़ावर हरजोतल आजही भीती वाटते आणि संपूर्ण प्रसंग आठवून त्याच्या डोळ्यात पाणी येतं. हरजोतला दुसरं आयुष्य मिळाल्याबद्दल तो देवाचे आभार मानतो आणि त्याच वेळी तो भारत सरकारचंही आभार मानतो, ज्यामुळे तो आपल्या कुटुंबाकडे आपल्या देशात परतला आहे. हरजोतनं ही संपूर्ण घटना शेअर केली आहे. एबीपी न्यूजनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
हरजोत म्हणाला, पहिली गोळी लागली तेव्हा असं वाटलं की आता जीव जाईल. पण दुसरी गोळी लागल्यावर धीर आला आणि मनात ठरवलं की आता काहीही झालं तरी बाहेर पडायचंच. हरजोत 7 मार्च रोजी भारतात आला मात्र तो आपल्या घरी गेला नव्हता आणि धौलकुआन येथील लष्करी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. येथे त्याला 21 दिवस ठेवण्यात आलं आणि 28 मार्च रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जेव्हा तो त्याच्या घरी पोहोचला तेव्हा कुटुंबामध्ये पोहोचल्यानंतर तो खूप आनंदी दिसत होता. 27 फेब्रुवारीच्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं आगेय
हरजोतने दिलेल्या माहितीनुसार, तो कीव्हमध्ये होता आणि तेथे युद्ध सुरू झालं होतं. एक-दोन दिवसांपूर्वी तेथील मॉलसह सर्व काही बंद करण्यात आलं होतं. हरजोतला युक्रेन सोडणे जास्त योग्य वाटलं. हरजोत जेव्हा इतर लोकांप्रमाणे मेट्रो स्टेशनवर पोहोचला तेव्हा त्याला आत प्रवेश दिला गेला नाही. यानंतर त्यानं कशी तरी कॅबची व्यवस्था केली, जी 1000 डॉलर्समध्ये बुक केली होती. हरजोतसोबत इतर दोन लोकंही ही कॅब शेअर करत होते, जे वेगवेगळ्या देशातील होते. सर्वांना युद्धापासून बचाव करण्यासाठी युक्रेनमधून बाहेर पडायचं होतं.
हरजोतनं सांगितलं की, अंधार पडला होता. त्याच्या कॅबनं दोन चेकपोस्ट ओलांडले होते, पण त्याला तिसऱ्या चेकपोस्टच्या पुढे जाण्याची परवानगी नव्हती. त्याला परत जाण्यास सांगण्यात आले. त्यांना सांगण्यात आलं की, युद्ध सुरू झालं आहे. अंधारात जाणं योग्य होणार नाही. त्यामुळे सकाळ झाली की पुढे प्रवास करावा. हरजोत कॅबमध्ये असताना अचानक दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. त्यानंतर हरजोत आणि कॅबमधील इतर खाली वाकले, पण दोन्ही बाजूंनी गोळ्या कारला लागल्या होत्या. पहिली गोळी त्याच्या उजव्या हाताला लागली, जी छातीच्या आत घुसली.
हरजोत म्हणला की, गोळी लागताच खूप त्रास होऊ लागला. जे असह्य झाल. तो स्वत:चा बचाव करत राहिला, पण गोळ्यांचा वर्षाव सुरूच होता. शरीरातून रक्त वाहत होते आणि वेदना वाढत होत्या. हरजोतनं सुमारे अर्धा तास वेदना सहन करत मेल्याप्रमाणे स्वतःला ठेवलं. कदाचित रशियन सैनिक तेथून निघून जातील या आशेवर, पण तसं झालं नाही. गोळ्यांचा वर्षाव सुरूच होता. त्यानंतर हरजोतला वाटलं की असे मरण्यापेक्षा बाहेर पडणं चांगले आणि मग काय होईल ते बघता येईल. हरजोत गाडी आणि भिंतीच्या मध्ये होता. बाहेर येताच त्याच्या डाव्या पायाला गोळी लागली. गोळी लागल्यावर त्याच्या वेदना अधिक असह्य झाल्या. यानंतर आणखी 3 गोळ्या त्याच्या शरीरावर लागल्या.
हरजोत बेशुद्ध पडला होता, त्याला काहीच आठवत नव्हते. तो बेशुद्ध होण्याआधी, त्याने एवढंच पाहिलं की त्याच्या आजूबाजूला जमिनीवर रक्त पडलेलं होतं. सुमारे 3 दिवसांनी हरजोत शुद्धीवर आला आणि तो एका खोलीत सापडला. आजूबाजूला दिवे लागले होते, मशीन्स बसवले होते. त्याला काहीच समजत नव्हतं. तेव्हा त्याला सांगण्यात आलं की, तो कीव्हच्या हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला 5 गोळ्या लागल्या आहेत. त्याला असंही सांगण्यात आले की, या हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वी त्याला इतर दोन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र त्याला 5 गोळ्या लागल्या होत्या, त्यामुळे त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
हरजोतचा मोबाईल त्याच्याकडे होता त्यानंतर त्याने घरच्यांशी बोलला. हरजोत सांगतो की, जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा पहिला विचार त्याच्या कुटुंबाचाही आला. युक्रेनमधील भारतीय दूतावासाला फोन केला असता त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही, असेही हरजोत सांगतात. त्याने 170 हून अधिक कॉल केले होते, मात्र जेव्हा त्याची माहिती भारतातील मीडियाद्वारे पोहोचली तेव्हा युक्रेनमधील भारतीय दूतावासानंही त्याची काळजी घेतली. हरजोत सांगतो की, त्याला रुग्णवाहिकेनं युक्रेन आणि पोलंडच्या सीमेवर आणलं होतं. तेथून पुन्हा दुसऱ्या रुग्णवाहिकेतून विमानात आणून नंतर विमानातून भारतात आणलं. यादरम्यान जनरल व्हीके सिंग यांनी त्यांची अनेकदा भेट घेतली. त्याला कुटुंबासारखे वातावरण देण्यात आले. त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि विमान भारतात पोहोचले तेव्हाही जनरल व्ही के सिंग त्याला भेटले. हरजोत भारत सरकारचे आभार मानले आहेत.