नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी मोठ्या संघर्षानंतर आता भारतात परतत आहेत. अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. झाशीची श्रेया गुप्ता ही विद्यार्थिनी देखील आता देशात परतली आहे. तिने परत आल्यावर थरारक अनुभव सांगितला आहे. विनिस्टा नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या श्रेयाने याबाबत माहिती दिली आहे. सुरुवातीला भारतीय दूतावासाकडून अनेक सूचना पाठवण्यात आल्या होत्या. मात्र विद्यापीठाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
श्रेयाने सांगितलं की तिला आणि तिच्या मित्रांना त्यांच्या कॉलेजमधून रोमानियाच्या बॉर्डरवर पोहोचण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. ते अत्यंत कठीण होतं. श्रेयाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ती रोमानिया सीमेवर पोहोचली तेव्हा गर्दी इतकी वाढली होती की गर्दी नियंत्रित करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांनी हवेत गोळीबार केला. त्यासोबतच तिला कडाक्याच्या थंडीत बॉर्डरवर 2 दिवस काढावे लागले. त्यानंतर तिला भारतात जाण्यासाठी फ्लाईट मिळाली. ज्या मार्गाने ती रोमानिया बॉर्डरवर पोहोचली, त्यावर येणारी अनेक शहरे रशियन सैन्याने केलेल्या बॉम्बहल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण हे भारताच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे आणि त्यामुळेच विद्यार्थी मोठ्या संख्येने तेथे जातात. भारतात जितकी फी आहे. तितक्या पैशामध्ये युक्रेनमध्ये सर्व शिक्षणाचा खर्च होतो असं श्रेयाने म्हटलं आहे. यासोबतच अभ्यासाबाबत सुरू असलेल्या शंकांवर तिने सांगितले की, सध्या युक्रेनमधील अनेक महाविद्यालयांनी शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप करण्याची परवानगी दिली आहे. इतर विद्यार्थ्यांचे भविष्य अजूनही टांगणीला लागले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
युद्धात माणुसकीचं दर्शन! 2400 किमीचा प्रवास करून युक्रेनमध्ये माजी सैनिकाने पोहचवली औषधं
युद्ध पेटलेलं असताना माणुसकीचं दर्शन घडवणारी एक घटना आता समोर आली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या जुन्या बाईकने 48 तास 2414 किलोमीटरचा प्रवास करून मोलाचं काम केलं आहे. युक्रेनमधील लोकांना औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला आहे. लियोन क्रिब असं या व्य़क्तीचं नाव असून त्याने ब्रिटनमधील वेस्ट ससेक्सच्या चेस्टरमधून आपल्या जुन्या बाईकने प्रवास सुरू केला. लियोनने फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, जर्मनी आणि पोलंडचा प्रवास केला. त्यानंतर औषधं घेऊन युक्रेनच्या कीव्हमध्ये पोहोचला. त्याने फ्रान्सच्या आर्मीसाठी देखील काम केलं आहे. त्याने पाच देशांतून प्रवास करत कीव्ह गाठलं.