नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे आर्थिक परिणाम जगातील बहुतांश देशांवर दिसून येत आहेत. भारतासह जगभरातील शेअर बाजार या युद्धामुळे अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये आहेत. मात्र या संकटामध्येही भारतातील काही गव्हाच्या बाजारांमध्ये कमाईची संधी साधली जात आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये मध्य प्रदेशमधील बेतूल येथील गव्हाच्या बाजारात गव्हाची किंमत क्विंटलमागे ८५ रुपयांनी वाढली आहे.
सर्वसाधारणपणे नवे पीक येण्याच्या काळात भाव कमी होतात. मात्र सध्या भारतातील गव्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हाच्या किमतींमध्ये तेजी आहे. दरवर्षी जगभरात सुमारे २० कोटी टन गव्हाची निर्यात होते. त्यामध्ये रशिया आणि युक्रेनचा वाटा ५ ते ६ कोटी टन एवढा आहे. मात्र सध्या तिथे सुरू असलेल्या युद्धामुळे चित्र बदलले आहे.
गव्हाचे उत्पादन घेणारा रशिया जगातील सर्वात मोठा तर युक्रेन हा तिसरा सर्वात मोठा गहू निर्यातदार देश आहे. २०२१-२०२२ या काळात रशियामधून ३.५ कोटी टन तर युक्रेनमधून २.४ कोटी टन गव्हाची निर्यात होण्याचा अंदाज आहे. मात्र दोन्ही देशांमधील युद्धामुळे पुरवठा बाधित होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ज्या देशांकडे सध्या गव्हाचा पुरेसा साठा आहे, अशा देशांकडे पुरवठ्यासाठी मागणी वाढणार आहे.
दरम्यान, भारत गव्हाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. सध्या भारताकडील गव्हाचा साठाही पुरेसा आहे. तो निर्यात वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. १ फेब्रुवारीपर्यंत देशातील केंद्रीय साठ्यामध्ये २.८२ कोटी टन गहू स्टॉक असल्याची नोंद आहे. याशिवाय बाजार आणि शेतकऱ्यांकडेही आधीचा स्टॉक आहे. तसेच नव्याने ११ कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.