चंदिगड - कोरोनाकाळात देशाच्या विविध भागात अडकलेल्या श्रमिकांसाठी अभिनेता सोनू सूद हा देवदुतासारखा धावून गेला होता. आता सोनू सूदची संस्था सूद चॅरिटेबल ट्रस्ट युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. या संस्थेने भारताच्या युक्रेनमधील दुतावासाशी संपर्क प्रस्थापित करून भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार युक्रेनमध्ये अडकलेल्या पंजाबसह भारतातील विविध भागातील विद्यार्थ्यांना सोनू सूदने आवाहन केले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी युक्रेनमध्ये युद्धस्थळी जिथे असतील तिथेच राहावे. म्हणजे त्यांना सुखरूप बाहेर काढता येईल. जर विद्यार्थी एकाच ठिकाणी राहिले तर भारतीय दुतावासाला त्यांच्याशी संपर्क साधणे सोपे होईल, असे सोनू सूदने सांगितले. सोनू सूदने विद्यार्थ्यांना सांगितले की, भारतीय दुतावास विद्यार्थ्यांचा डेटा घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीदरम्यान, सोनू सूद विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आला आहे. युक्रेनहून परतलेले विद्यार्थी त्यांना सोनू सूद आणि त्याच्या टीमकडून कशाप्रकारे मदत मिळाली, हे सांगत आहेत. दरम्यान, सोनूने त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण काळ आहे. तसेच कदाचित हे माझ्यासाठी आतापर्यंतचे सर्वात कठीण आव्हान आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये काही भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एका भारतीय विद्यार्थिनीने सांगितले की, ते सात दिवस खारकिव्हमध्ये बंकरमध्ये होते. तिथून ते १४ किमी चालून रेल्वे स्टेशनवर गेले तेव्हा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तिथून हाकलून लावले. त्यानंतर ३० किमी लांब जाऊन एका बंकरमध्ये आश्रय घेतला.