Russia Ukraine War : 'इथेच शिकेन पण परदेशात जाणार नाही'; युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला भयंकर अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 08:27 AM2022-03-03T08:27:23+5:302022-03-03T08:36:18+5:30

Russia Ukraine War : शिवपाल घरी परतल्यावर त्याच्या घरी अत्यंत आनंदाचं वातावरण आहे.

Russia Ukraine War student of dholpur returned from ukraine said i will not go abroad to study now | Russia Ukraine War : 'इथेच शिकेन पण परदेशात जाणार नाही'; युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला भयंकर अनुभव

Russia Ukraine War : 'इथेच शिकेन पण परदेशात जाणार नाही'; युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला भयंकर अनुभव

googlenewsNext

नवी दिल्ली - युक्रेनमधील तणावपूर्ण परिस्थितीत अद्यापही अनेक भारतीय विद्यार्थी हे अडकून राहिले आहेत. भारतीयांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी मोदी सरकार देखील पावलं उचलत आहेत. याच दरम्यान राजस्थानचा एक विद्यार्थी आपल्या घरी सुखरूप परत आला आहे. 'इथेच शिकेन पण आता परदेशात जाणार नाही' असं म्हणत युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने भयंकर अनुभव सांगितला आहे. शिवपाल असं या एमबीबीएस विद्यार्थ्याचं नाव असून तो राजस्थानच्या धौलपूरमध्ये परत आला आहे. मेडिकलचं पुढचं शिक्षण इथेच झालं तर पुन्हा युक्रेनला जाणार नाही असं शिवपालने म्हटलं आहे. 

शिवपाल घरी परतल्यावर त्याच्या घरी अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, "युक्रेनमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. तिथे सातत्याने हल्ले केले जात आहेत. बॉर्डरपर्यंत पोहोचणं तर खूपच अवघड आहे. 30 किमी पायी चालत बॉर्डरपर्यंत पोहोचलो. अनेक विद्यार्थी अद्यापही तिथेच आहेत. ते भारतात परत येण्याची वाट पाहत आहेत. युद्धाच्या परिस्थिती युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांना स्थानिक सरकारकडून कोणतीच मदत मिळत नाही. मी सुखरुप घरी परत आल्यामुळे भारत सरकार आणि राजस्थान सरकारचे आभार मानतो. त्यांनी आमची भरपूर मदत केली."

"युक्रेनमध्ये खाण्या-पिण्याची काही व्यवस्था नाही"

"राजस्थान सरकारच्या अधिकाऱ्यांनी आमची खूपच मदत केली. माझ्या घरापर्यंतच्या प्रवासाची जबाबदारी पार पाडली. युक्रेनमध्ये खाण्या-पिण्याची काही व्यवस्था नाही. आम्हाला अनेक खडतर प्रसंगाचा सामना करावा लागला. आम्ही दोन रात्री बॉर्डरवर थांबलो आणि आता तिसऱ्या दिवशी येथे येऊ शकलो. बॉर्डरवर प्रचंड गर्दी आहे" अशी माहिती शिवपालने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका भारतीय विद्यार्थ्याने मदतीसाठी साद घातली आहे. "ब्रेडचा एक तुकडा उरलाय, बंकरमध्ये हाडं गोठवणारं तापमान, आम्हाला येथून घेऊन चला" असं त्याने म्हटलं आहे. असोयुन हुसैन असं या भारतीय विद्यार्थ्याचं नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. बंकरमध्ये अडकून राहिलेल्यांची नेमकी कशी परिस्थिती आहे याची त्याने माहिती दिली आहे. 

'फक्त ब्रेडचा तुकडा उरलाय, हाडं गोठवणारं तापमान, आम्हाला येथून घेऊन चला'

एका न्यूज एजन्सीसोबत फोनवर चर्चा करताना हुसैन याने "युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जेवण आणि औषधं मिळणं अत्यंत कठीण झालं आहे कारण येथे स्थानिक लोकांना प्राथमिकता दिली जात आहे. बंकरमध्ये तापमान इतकं खाली गेलं आहे की बर्फ जमा झाला आहे. गेल्या 48 तासांत आमच्याकडे खाण्यासाठी फक्त ब्रेडचा एक छोटासा तुकडा उरला आहे. जेवण तर लांबची गोष्ट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी देखील अनेक तास वाट पाहावी लागत आहे. येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बंकरमध्ये खूप जास्त गर्दी आहे. आमचं जॅकेट देखील खराब झालं आहे. थंडी इतकी आहे की नेमकं काय करावं हे समजत नाही. आमच्याकडे 4-5 बेडशीट होत्या. आम्ही त्यावरच रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मवर झोपत आहोत" असं असोयुन हुसैन याने म्हटलं आहे. 


 

Web Title: Russia Ukraine War student of dholpur returned from ukraine said i will not go abroad to study now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.