तिरुवनंतपुरम - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तुंबळ युद्धामुळे शेकडो भारतीयविद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान एका भारतीय विद्यार्थिनीने युक्रेनमधून अनेक संकटांचा सामना करत तिच्या पाळीव कुत्र्यालाही सोबत मायदेशी आणले आहे. त्यामुळे या विद्यार्थिनीचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
याबाबत समोर आलेल्या वृत्तानुसार या विद्यार्थिनीचं नाव आर्या ऑल्द्रन असे आहे. ती केरळमधील राहणारी आहे. तिचा जो फोटो शेअर होत आहे. त्यामध्ये तिच्यासोबत तिच्या हातामध्ये एक पाळीव कुत्रा दिसत आहे. तसेच या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर युद्धक्षेत्रातून पाळीव कुत्र्यासह सुखरूपणे परत आल्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.
आता सोशल मीडियावर आर्याने तिच्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात येत आहे. एका युझरने तिचे कौतुक करताना म्हटले की, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपला देश सोडणे योग्य समजले नाही. तक एका भारतीय विद्यार्थिनीने तिच्या पाळीव कुत्र्याला युद्धक्षेत्रात एकटे सोडले नाही.
आर्या ही युक्रेनमधील विन्नित्सामध्ये असलेल्या नॅशनल पिरोगोव्ह मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे. केरळचे शिक्षणमंत्री व्ही. सिवनकुट्टी यांनी सांगितले की, आर्या इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी आहे. जग अशाच प्रेमाने चालते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात काल एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. नवीन हा कर्नाटकमधील रहिवासी होता. तो खारकिव्हमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या सेमिस्टरचे शिक्षण घेत होता. तो खाद्यपदार्थ घेण्यासाठी बंकरमधून बाहेर आला होता. त्याचवेळी झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता.