युक्रेनच्या राजधानीपासून ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात बुधवारपर्यंत सारे काही सुरळीत होते; पण गुरुवारची पहाट भीतीदायक परिस्थिती घेऊन उगवली. सकाळपासूनच रशियन क्षेपणास्त्रांचे हल्ले आमच्याही शहरांवर सुरू झाले. क्षणोक्षणी परिस्थिती अतिशय भयावह होत चालली आहे. सर्वत्र बॉम्बच्या हल्ल्याने उद्ध्वस्त इमारती, रस्ते आणि आकाशात धुराचे डोंगर साचले आहेत. समोरच्या क्षणी काय होईल, या विचाराने तेथील भारतीयांना मायभूमीची आठवण झाली आहे.
युक्रेनच्या इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात भारतातील 18 हजार नागरिक अडकले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांतील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागपूरच्या पवन मेश्रामशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता पवनने सांगितले की, रशियाने आतापर्यंत अर्धे युक्रेन ताब्यात घेतले आहे. राजधानी किव्हपासून आमचे शहर ५०० किलोमीटर अंतरावर आहे. भारतातील जवळपास १२०० विद्यार्थी येथे सध्या शिक्षण घेत आहेत. हे सर्वच विद्यार्थी आता मायदेशात परत येऊ इच्छित आहेत. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे ते अडकून पडले आहेत. त्यातच, विमानाच्या तिकाटांचेही दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
युक्रेनमधील युद्धपरिस्थितीमुळे विमानसेवा कोडलमडली आहे, तर काही विमानांतून तिकीट उपलब्ध होत असले तरी या तिकीटाचे दर दुप्पट आहेत. येथे अडकलेले विद्यार्थी मोबाईलद्वारे कुटुंबीयांशी संपर्क साधत आहेत. मात्र, तिकीट मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. भारतीय दुतावासाशी संपर्क करुन हे विद्यार्थी मदतीची अपेक्षा करत आहेत.
विमान तिकीट दुप्पट, विद्यार्थी त्रस्त
पवनने सांगितले की, भारतीय दूतावासाने २० तारखेला आम्हाला युक्रेन सोडण्यासंदर्भात सूचना केली. भारतात जाण्यासाठी एअर इंडियाची विमाने २२, २४ आणि २६ तारखेला उपलब्ध करून देण्यात आली. तिकीट प्रत्येकाने आपापले काढायचे आहे. एरव्ही किव्ह ते दिल्ली या प्रवासासाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो; परंतु आता ६० ते ८० हजार रुपये आकारले जात आहेत. इतके महाग तिकीट कसे काढणार?
केंद्र व महाराष्ट्र सरकारला विनंती
युक्रेनमध्ये सध्या सगळ्या फ्लाइट बंद झाल्या आहेत, इथे नो फ्लाइट झोन झाले आहे, त्यामुळे भारत सरकारने येथील लोकांना एअरलिफ्ट करावे, अशी विनंती भारतीय विद्यार्थी करत आहेत. यासोबतच महाराष्ट्र सरकारकडेही येथील मराठी विद्यार्थ्यांनी तिकिटांचे दर कमी करण्याची विनंती केली आहे.