Russia-Ukraine War Updates: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याला युक्रेनमध्ये लष्करी कारवाईचे आदेश दिले आणि संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. युक्रेनमध्ये लष्करी कारवाईचे आदेश दिल्याच्या काही मिनिटांमध्ये युक्रेनच्या विविध ठिकाणी बॉम्बहल्ले आणि हल्ल्यांचं वृत्त समोर येऊ लागलं. त्यानंतर युक्रेनमध्ये धुमाकूळ उडाला आहे. प्रत्येकजण आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यासाठी धाव घेत आहे. तर मेट्रो स्थानकांवर नागरिक गर्दी करू लागले आहेत. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थी देखील अडकून पडले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांना केंद्र सरकारडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
युक्रेनमधील सध्याच्या परिस्थिती खूप चिंताजनक असल्याचं तेथील भारतीय दुतावासात असलेल्या नागरिकांनी म्हटलं आहे. तसंच अनेक भारतीय नागरिक युक्रेनच्या भारतीय दुतावासाकडे येऊ लागले आहेत. केंद्राकडून युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी जारी करण्यात आलेल्या अॅडव्हायजरीनुसार नागरिकांना जिथं आहात तिथंच सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या घरी, हॉस्टेल किंवा हॉटेलमध्ये असाल तर तिथंच राहा असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
"जे लोक युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेनं येत आहेत त्यांनी अजिबात असं करू नये. त्यांनी आपापल्या ठिकाणी परतावं", असं भारतीय दूतावासाकडून आवाहन करण्यात येत आहे. कारण रशियाकडून युक्रेनच्या राजधानीलाच लक्ष्य केलं जात आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून याबाबतचं आवाहन करण्यात येत आहे. तसंच रशियानं युद्धाची घोषणा केल्यामुळे युक्रेनच्या हवाई क्षेत्रात प्रवासी विमानांनाही बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरवापसी मोहिमेलाही मोठा ब्रेक लागला आहे. अशात नागरिकांनी आपापल्या घरीच राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच भारत सरकार इतर पर्यांयाचा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
हेल्पलाइन नंबर केले जारी...+38 0997300428+38 0997300483+38 0933980327+38 0635917881 +38 0935046170
युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या मदत आणि सुरक्षेसाठी वरील हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. यावर संपर्क करुन मदत मिळवता येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.