नवी दिल्ली – मागील ७ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. मात्र या युद्धाचा फटका यूक्रेनमधील भारतीयांना बसत आहे. मेडिकल शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतानं ऑपरेशन गंगा हाती घेतले आहे. भारतीय वायूदलही यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करत आहेत.
यूक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने अनेक देशांशी संपर्क साधला आहे. त्यात भारताने रशियाच्या दूतावासाशी संपर्क साधत यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याची विनंती केली आहे. भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी याबाबत पुष्टी केली आहे. अलीपोव म्हणाले की, आम्ही खारकीव आणि पूर्व यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. रशियाच्या हद्दीतून त्याठिकाणी अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती डेनिस अलीपोव्ह यांनी दिली.
डेनिस अलीपोव्ह म्हणाले की, आम्ही भारताचे धोरणात्मक भागीदार आहोत. संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखवलेल्या संतुलित भूमिकेबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत. भारताला या संकटाची जाणीव आहे. भारतासोबतच्या संरक्षण करारावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही. भारताला S-400 च्या पुरवठ्याचा प्रश्न आहे, कोणत्याही अडथळ्याची अपेक्षा करू नका. हा करार अव्याहतपणे सुरू ठेवण्याचे मार्ग आहेत. निर्बंध जुने असो किंवा नवीन, कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये असं रशियन राजदूताने सांगितले आहे.
...म्हणून भारताची तटस्थ भूमिका
रशिया सध्या भारताला सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना देण्याच्या भारताच्या निर्णयामुळे, रशियाकडून आयात करण्यात येणाऱ्या संरक्षण उपकरणांचा वाटा निश्चितच खाली आला आहे, जो ७०% वरून ४९% वर आला आहे. असे असूनही, रशिया सध्या भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. भारताने आयात केलेल्या संरक्षण उपकरणांपैकी ६० टक्के रशियाकडून येतात. अशा परिस्थितीत रशियाच्या विरोधात जाऊन भारत आपल्या संबंधांचा त्याग करू इच्छित नाही.
युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे आणि यशस्वीपणे बाहेर काढण्यासाठी भारताला युद्धात सहभागी असलेल्या दोन्ही देशांकडून सुरक्षा आश्वासनांची आवश्यकता आहे. अशा स्थितीत भारताचा दृष्टीकोन कोणत्याही एका देशाकडे झुकलेला दिसला तर तेथे उपस्थित भारतीय नागरिकांसाठी संकटे निर्माण होऊ शकतात त्यामुळे भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू शकत नाही.