युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी ऑपरेशन गंगाही राबविले जात आहे. यातच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध केव्हा होणार, हे त्यांना आधीच माहीत होते. मग तेथील भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही? असा सवाल ममतांनी केला आहे.
वाराणसी येथे एका रॅलीला संबोधित करताना ममता म्हणाल्या, युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि पंतप्रधान मोदी येथे सभा घेत आहेत. काय गरज आहे? जर आपले रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध होणार, हे आपल्याला आधीपासूनच माहीत होते. तेव्हाच आपण भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही."
ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला. केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना त्यांच्याच भरवशावर सोडले आहे, असा आरोप त्यांनी केला. एवढेच नाही, तर युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि पंतप्रधान निवडणूक सभा घेत आहेत. कशाची आवश्यकता आहे. भारतीयांना परत आणणे आवश्यक नाही का? असा सवालही ममता यांनी यावेळी केला.