रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. महत्वाची बाब अशी की दोन्ही देशांच्या नेतृत्त्वानं आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. याच संदर्भात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं अत्यंत महत्वाचं विधान समोर आलं आहे. युक्रेन सरकार हटवण्याचा कोणताही इरादा नसल्याचं पुतीन यांनी म्हटलं. त्यामुळे, अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र, या युद्धाचे जगभरातील देशांवर परिणाम झाले आहेत. भारताचे जवळपास 20 हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले होते.
भारत सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहित राबवत देशातील नागरिकांना भारतात परत आणले. पंतप्रधान मोदींनी 4 केंद्रीयमंत्र्यांना युक्रेनसीमेनजीकच्या देशांमध्ये पाठवले होते. वायू दलाच्या सैन्यानेही या मोहिमेत मोठं योगदान दिलं. युक्रेनच्या विविध शहरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यात सरकारला यश आलं आहे. भारतासह इतरही देशातील विद्यार्थ्यांना भारत सरकारने मदत केली आहे. बांग्लादेशच्या 9 नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यास भारत सरकारने मदत केली. त्याबद्दल बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
भारताने ऑपरेशन गंगा द्वारे भारतासह, नेपाळ, पाकिस्तान, ट्युनीशियासह अन्य देशातील नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढले आहे. विशेष म्हणजे एका पाकिस्तानी मुलीने युक्रेनच्या कीव्ह शहरातून सुखरुप सुटका केल्याबद्दल भारतीय दुतावास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
पाकिस्तानच्या मुलीने मानले आभार
व्हिडिओमध्ये ती मुलगी 'माझे नाव अस्मा शफीक आहे आणि मी पाकिस्तानची आहे' असे म्हणताना दिसत आहे. मी कीवमधील भारतीय दूतावास आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छितो, त्यांनी मला कीवमधून बाहेर पडण्यास मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी अस्माला युद्धग्रस्त भागातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची आणि पश्चिम युक्रेनला पाठवण्याची व्यवस्था केली आहे.