लखनऊ: युक्रेन आणि रशियाचं सुद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. बलाढ्य रशियन सैन्याचे युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोदी सरकारनं ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना मायदेशी परतताना अडचणींचा सामना करावा लागला. या विद्यार्थ्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे.
उत्तर प्रदेशच्या कौशांबीचा रहिवासी असलेला प्रमोद कुमार काल रात्री युक्रेनहून परतला. प्रमोद सुखरुप परतल्यानं कुटुंबानं लाडू वाटून आनंद साजरा केला. प्रमोद खारकीव्हमध्ये वास्तव्यास होता. तो व्ही. एन. कराझिन विद्यापीठात एमबीबीएसचा अभ्यास करत होता. युक्रेन सोडताना झालेला त्रास, मार्गात आलेल्या अडचणी प्रमोदनं सांगितल्या.
स्थानिक सरकारकडून आम्हाला मदत मिळाली नाही. त्यामुळे सगळे विद्यार्थी स्वत:च बाहेर पडले. ट्रेनमध्ये चढू पाहणाऱ्या भारतीयांना लाथा मारून बाहेर काढण्यात येत होतं, अशा शब्दांत प्रमोदनं आपबिती सांगितली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची लवकरात लवकर सुटका करण्याचं आवाहन त्यानं सरकारला केलं.
२४ फेब्रुवारीला प्रमोद कुमारनं पहिल्यांदा युक्रेनमध्ये स्फोटांचा आवाज ऐकला. त्यानंतर तो आपल्या सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत बंकरमध्ये लपला. तिथूनच त्यानं एक व्हिडीओ तयार करून कुटुंबाला पाठवला. भारत सरकारकडे मदत मागितली. प्रमोद अडकून पडलेल्या खारकीव्हमध्ये रशियानं सर्वाधिक हल्ले केले. खारकीव्हचे नागरिक असलेल्या बहुतांश जणांनी सध्या शेजारी देशांमध्ये आश्रय घेतला आहे.