Russia vs Ukraine War: -१० डिग्रीमध्ये १५ किमी चालत आम्ही युक्रेन सोडलं, याला सुटका म्हणतात का?; विद्यार्थिनीचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 03:24 PM2022-03-05T15:24:47+5:302022-03-05T15:28:08+5:30
Russia vs Ukraine War: युक्रेनबाहेर पडेपर्यंत भारतीय दुतावासातील कोणीच आमची मदत केली नाही आणि सरकार म्हणतंय सुटका केली; भारतात परतलेल्या विद्यार्थिनीकडून संताप व्यक्त
नवी दिल्ली: युक्रेन आणि रशियाचं सुद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. बलाढ्य रशियन सैन्याचे युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोदी सरकारनं ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना मायदेशी परतताना अडचणींचा सामना करावा लागला. या विद्यार्थ्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे. युक्रेनमधून बाहेर पडताना, बाहेर पडल्यावर किती आणि काय हालअपेष्टा सोसाव्या लागल्या याची आपबिती विद्यार्थ्यांनी सांगितली.
'२४ फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं. आम्ही घाबरलो होतो. दोन दिवस आम्ही भारतीय दुतावासाशी संपर्क साधत होतो. कोणीच कॉल घेतला नाही. आमच्याकडे असलेलं सगळं सामान घेऊन १५ किलोमीटर चाललो. चार-चार रात्री उघड्यावर उणे १० ते १५ अंश तापमानात काढल्या. आम्हाला मारहाण झाली आणि आता सरकार विद्यार्थ्यांची सुटका केली म्हणून इव्हेंट करत आहे. क्रेडिट घेत आहे,' अशा शब्दांत दिव्यांशी सचान या विद्यार्थिनीनं संताप व्यक्त केला. रोमानियाहून दिल्लीला परतलेल्या दिव्यांशीनं एका हिंदी वृत्तपत्राशी संवाद साधत घडलेला प्रकार सांगितला.
मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी रोमानियाला गेलेली दिव्यांशी पहिल्या वर्षात शिकते. रोमानियाच्या सीमेवर झालेल्या धक्काबुक्कीचा फटका तिलाही बसला. 'सीमेवर अक्षरश: चेंगराचेंगरी झाली. लोक माझ्या डोक्यावर, खांद्यांवर पाय ठेऊन पुढे जात होते. आम्ही रोमानियाची सीमा ओलांडल्यावर भारतीय दुतावासाचे कर्मचारी भेटले,' असं दिव्यांशीनं सांगितलं.
आम्ही विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका केली असा सरकारचा दावा असेल तर तो पूर्णपणे खोटा आहे. पोलंडहून मोफत विमान प्रवास करून भारतात आणणं याला सुटका म्हणत नाही. भारत सरकारनं युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी आमची मदत केली असती तर त्याला सुटका म्हणता आलं असतं. देशातल्या लोकांना सत्य कळायला हवं, असं दिव्यांशी म्हणाली.
रोमानियाची सीमा ओलांडेपर्यंत आम्हाला भारतीय दुतावासाकडून कोणतीच मदत मिळाली नाही. आम्ही ४ हजार विद्यार्थी होतो. ४ रात्री आम्ही बर्फात काढल्या. तापमान उणे १० ते १५ अंशपर्यंत घसरलं होतं. एकावेळी केवळ चारच विद्यार्थ्यांना सीमा ओलांडू दिली जात होती. आमच्या मदतीला दुतावासाचा कोणताही अधिकारी नव्हता, अशा शब्दांत दिव्यांशीनं तिचा भयानक अनुभव सांगितला.