नवी दिल्ली/मॉस्को: युक्रेनविरोधात युद्ध पुकारणारा रशिया सध्या चहूबाजूंनी अडचणीत सापडताना दिसत आहे. अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. त्याचा फटका रशियाला बसताना दिसत आहे. रशियाकडून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू न घेण्याचा निर्णय अमेरिकेनं जाहीर केला आहे. युरोपातील अन्य देशही असाच निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे रशिया आता आपल्या इंधनासाठी नवी बाजारपेठ शोधत आहे. याचा थेट फायदा भारताला होताना दिसत आहे.
रशियानं भारताला सवलतीच्या दरात खनिज तेल आणि अन्य वस्तू विकण्याची तयारी दर्शवली. तसा प्रस्तावच रशियाकडून भारताला देण्यात आला आहे. रशियाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर भारत विचार करत असल्याचं वृत्त रॉयटर्सनं दोन भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे. भारतानं रशियाचा प्रस्ताव स्वीकारल्यास दोन्ही देशातला व्यवहार रुपया-रुबलमध्ये होईल. खनिज तेलासोबतच युरिया खरेदीवरही रशियानं भारताला सवलत देऊ केली आहे.
रशिया खनिज तेल आणि अन्य उत्पादनांवर मोठी सवलत देत आहे. त्यांच्याकडून खरेदी करताना आम्हाला निश्चितपणे आनंद होईल. टँकर, विम्याचं कवच आणि ऑईल ब्लेंड यांच्याशी संबंधित काही प्रश्न आहेत. ते सुटल्यावर आम्ही सवलतीचा प्रस्ताव स्वीकारू, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे बहुतांश आंतरराष्ट्रीय व्यापारी रशियाकडून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणं टाळत आहेत. मात्र हे निर्बंध आम्हाला रशियाकडून इंधन खरेदी करण्यापासून रोखू शकत नाही, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली. रुपया-रुबलची व्यवस्था तयार करण्यासंदर्भात काम सुरू आहे. या व्यवस्थेचा वापर तेल आणि अन्य उत्पादनं खरेदी करण्यासाठी केला जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र रशिया किती सवलतीत खनिज तेल देणार हे सांगण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी नकार दिला.