नवी दिल्ली: युक्रेन आणि रशियाचं सुद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. बलाढ्य रशियन सैन्याचे युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोदी सरकारनं ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना मायदेशी परतताना अडचणींचा सामना करावा लागला. या विद्यार्थ्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे. युक्रेनमधून बाहेर पडताना, बाहेर पडल्यावर किती आणि काय हालअपेष्टा सोसाव्या लागल्या याची आपबिती विद्यार्थ्यांनी सांगितली.
आम्ही अनेकदा भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण कॉल, मेसेजला उत्तर आलं नाही, अशा शब्दांत बिहारच्या सहरसामध्ये राहणाऱ्या प्रतिभानं तिला आलेला भीषण अनुभव सांगितला. आम्हाला होत असलेला त्रास आमच्या एका मैत्रिणीनं फेसबुकवर व्हिडीओच्या माध्यमातून मांडला, त्यानंतर लगेचच दुतावासातून कॉल आला आणि व्हिडीओ लगेच डिलीट करायला सांगितलं, असं प्रतिभा म्हणाली. 'दैनिक भास्कर' या हिंदी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीसोबत प्रतिभा बोलत होती.
अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याला प्राधान्य देण्याऐवजी सरकार प्रचारात व्यग्र असल्याबद्दल प्रतिभानं नाराजी व्यक्त केली. प्रतिभा विनिस्तिया वैद्यकीय महाविद्यालयात चौथ्या वर्षाला आहे. 'युद्ध सुरू झाल्यानंतर दोन दिवस आम्ही वाट पाहिली. दुतावासातून कोणतीच मदत मिळत नसल्यानं २६ फेब्रुवारीला आम्हीस बस बुक केली. एका विद्यार्थ्याकडून ६ हजार रुपये घेतले गेले. एजंट्स आणि दुतावासातील कर्मचाऱ्यांचा यात हात असावा, असा संशय आम्हाला वाटतो,' असं प्रतिभा म्हणाली.
बसमधून १४ तास प्रवास करून आम्ही रोमानियाच्या सीमेवर पोहोचलो. बसमधून उतरल्यावर उणे २० डिग्री तापमानात १५ किलोमीटर चाललो. आमच्या खांद्यावर सामान होतं. रोमानियाच्या सीमेवरही भारतीय दुतावासातलं कोणीच नव्हतं. आफ्रिकन देशांचे विद्यार्थी अगदी सहज सीमा ओलांडत होते. त्यांच्या देशांचे दुतावासातील अधिकारी तिथे उपस्थित असल्यानं त्यांना कोणताच त्रास झाला नाही, असं प्रतिभानं सांगितलं.
रोमानियाच्या लोकांनी आम्हाला मदत केली. थांबायला जागा दिली. पोटभर जेवण दिलं. रोमानियात आम्हाला भारतीय दुतावासाचे कर्मचारी भेटले. त्यांनी आमच्याशी गैरवर्तन केलं. जो बाथरूम स्वच्छ करेल, त्याला आधी भारतात जाता येईल आणि बाकीच्यांना नंतर जाऊ देण्यात येईल, असं आम्हाला सांगण्यात आलं, अशा शब्दांत प्रतिभानं धक्कादायक प्रकार सांगितला.
प्रत्येक विद्यार्थी दमलेला होता. चार दिवस बर्फात घालवल्यानं बाथरुम धुण्याचे त्राण कोणाच्याही शरीरात नव्हते. मात्र घरी जायचं असल्यानं काही विद्यार्थी टॉयलेट धुण्यासाठी गेले. भारतीय दुतावासाचे कर्मचारी हे सगळं पाहत होते. मात्र त्यांनी काहीच केलं नाही, अशा शब्दांत प्रतिभानं आपबिती मांडली.