नवी दिल्ली - देशात सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत युक्रेन-रशिया वादावर चर्चा झडत आहेत. या युद्ध परिस्थितीवर भाष्य करताना भारताची भूमिका काय आहे, भारताने काय भूमिका घ्यायला हवी हेही चर्चिले जात आहे. सद्यस्थितीत भारताने तटस्थ भूमिका घेतली असून तेथे फसलेल्या 20 हजार भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर, देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही यासाठी दबाव आणण्यात येत आहे. मात्र, हे युद्ध थांबले पाहिजे, अशीच भूमिका सर्वस्वी दिसून येते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनीही सध्या सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धावर मत मांडलं आहे. भारताचा मित्र असलेल्या रशियावर भारताने दबाव टाकायला हवा, अशी भूमिका आरएसएसचे सचिव कुमार यांनी घेतली. तसेच, युक्रेनविरुद्ध होत असलेल्या सैन्य दलाच्या कारवाईला तात्काळ थांबविण्यात यावे, त्यासाठी भारताने इतर देशांसोबत हातमिळवणी करत रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन याच्यावर दबाव आणला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.
भारतासह जगभरातील सर्वच देशांच्या सरकारने, राजकीय विशेषज्ञांनी, सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांनी, नागरिकांनी, समाजसुधारकांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. या चर्चेतूनच हे सुरू असलेलं युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, व्लादीमीर पुतीन यांच्यावर दबाव टाकला पाहिजे. भारत शांतताप्रिय देश आहे. युद्धाला प्रोत्साहन देईल, अशी कुठलिही परिस्थिती निर्माण होता कामा नये. युद्धाचे परिणाम अतिशय भयानक, असहनीय आणि पिडा देणारे असतात, असेही वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी म्हटले.
रशिया युक्रेनसोबत वाटाघाटीला तयार
युक्रेनच्या सैन्यानं शरणागती पत्करल्यास रशिया चर्चा करण्यास तयार असल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटलं आहे. रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना लावरोव यांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. 'आम्ही वाटाघाटी करण्यासाठी कोणत्याही क्षणी तयार आहोत. युक्रेनच्या सैन्यानं शस्त्रं खाली ठेवल्यास चर्चा करण्याची आमची तयारी आहे,' असं लावरोव म्हणाले आहेत.