रविवारी इंडिगो एअरलाइन्सच्या दिल्ली-गोवा फ्लाइटमधील एका प्रवाशाने वैमानिकावर हल्ला केला. यावेळी वैमानीक उड्डाणाला उशीर झाल्याची घोषणा करत होता. यावेळी ही मारहाण झाली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये पिवळ्या हुडीमध्ये एक संतप्त प्रवासी पायलटच्या दिशेने धावत असून त्याला थप्पड मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक एअर होस्टेस प्रवाशांना पायलटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. प्रवासी पायलटला 'तुम्हाला विमान चालवायची नसेल, तर चालवू नका, मला सांगा, आम्ही उतरू' असं बोलताना ऐकू येते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रीया येत आहेत. आता या मारहाणी मागचे कारण समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शी एका रशियान मॉडेलने या घटनेमागचे कारण सांगितले आहे.
पाकिस्तानमध्ये अंडे ४०० रुपये डझन, चिकनही महागलं; महागाईने नागरिक त्रस्त
रशियन-भारतीय मॉडेल इव्हगेनिया बेलस्कायाने एक व्हिडीओ जारी केला असून यात इंडिगो फ्लाइटमध्ये घडलेल्या घटनेबद्दल सांगितले आहे. गोव्याला जाण्यासाठी तीही त्याच फ्लाइटमध्ये होती. या घटनेची माहिती देताना बेलसाकिया सांगते, 'मी आणि माझी टीम दिल्ली गोव्याचे फ्लाइटसाठी IGI विमानतळावर पोहोचलो, हे विमान सकाळी ७.४० वाजता होते. पण ते विमान त्या वेळेला निघालेच नाही. आम्ही इंडिगोशी चौकशी केली तेव्हा ते कधी १ तास उशिराने निघेल तर कधी २ तासांनी उड्डाण करेल असं सांगत होते. त्यांनी आम्हाला १० तास बसून ठेवले.
इव्हगेनिया बेलस्काया पुढे सांगते, 'नंतर इंडिगोकडून असे सांगण्यात आले की आता प्रवासी विमानात बसू शकतात. सर्व प्रवासी विमानात बसले, तरीही उड्डाण दोन तास उशीरा झाले. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले होते. एवढा उशीर का झाला आणि उड्डाण कधी होणार हे ते क्रूला सतत विचारत होते. त्यानंतर पायलट आला आणि प्रवाशांना म्हणाला की तुम्ही लोक खूप प्रश्न विचारता. तुमच्यामुळे आमची टर्म चुकली आहे, फ्लाइटला आता आणखी उशीर होईल. इव्हगेनिया बेलस्काया यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय पायलट उशीर होण्यासाठी प्रवाशांना दोष देत होता, त्यामुळे एका प्रवाशाने चिडून त्याच्यावर हल्ला केला. ती पुढे सांगते, मला वाटते की प्रवाशाने पायलटवर हल्ला करायला नको होता. मी १०० टक्के सहमत आहे की हा योग्य दृष्टीकोन नाही. पण विमानाच्या उशीरासाठी पायलट प्रवाशांना दोष का देत होता? , असा सवालही तिने यात केला आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले....
याप्रकरणी नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वक्तव्यही आले आहे. ते म्हणाले, 'दिल्लीमध्ये काल खूप धुके होते, त्यामुळे सकाळी ५ ते ९ या वेळेत दृश्यमानता शून्यावर आली. त्यामुळे, अधिकाऱ्यांना CAT III धावपट्टीवरही तात्पुरते ऑपरेशन थांबवण्यास भाग पाडले गेले. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यामध्ये दिल्ली विमानतळाला CAT III-सक्षम चौथी धावपट्टी त्वरित कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी डीजीसीए परवानगी देईल. खराब हवामानामुळे उड्डाण रद्द होणे आणि उड्डाणांना होणारा विलंब पाहता गैरसोय कमी करण्यासाठी प्रवाशांशी चांगल्या संवादावर भर देत DGCA ने सर्व विमान कंपन्यांसाठी एक SOP जारी केला आहे.
आधी मारहाण, आता माफीचा व्हिडिओ समोर आला
प्रवाशाने आधी पायलटला मारहाण केली यानंतर काही वेळातच त्या प्रवाशाने पायलटची माफी मागितल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या प्रवाशाचे नाव साहिल कटारिया आहे. या प्रवाशाने हात जोडून पायलटची माफी मागणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या नवीन व्हिडिओमध्ये साहिल कटारिया रेकॉर्डिंग करणाऱ्या एका व्यक्तीला 'सॉरी सर' म्हणताना दिसत आहे.