नवी दिल्ली:भारतीय लष्कराची ताकत आता आणखी वाढणार आहे. रशियाने S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची (S-400 Air Defence Missile System) पहिली खेप भारताकडे पाठवली आहे. कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्याला सामोरे जाण्यास सक्षम असलेले S-400 क्षेपणास्त्र पंजाब सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले असून, तेथून चीन आणि पाकिस्तानच्या कोणत्याही हालचालींना प्रत्युत्तर दिले जाऊ शकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्र प्रणालीचे भाग हवाई आणि समुद्रमार्गे भारतात पोहोचले असून ते लवकरात लवकर नियुक्त केलेल्या ठिकाणी तैनात केले जातील. या वर्षाच्या अखेरीस भारताला क्षेपणास्त्र प्रणालीचा पहिला स्क्वाड्रनही मिळेल. त्यानंतर पूर्व आघाडींवर लक्ष केंद्रित केले जाईल.
शक्ती वाढणार
रशियाकडून मिळालेले क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम आहे. यामुळे भारताची मारक क्षमता मजबूत होईल. S-400 मध्ये सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत, जी लक्ष्यांवर मारा करण्यात पटाईत आहेत. S-400 ची गणना जगातील सर्वात आधुनिक शस्त्रांमध्ये केली जाते. हे क्षेपणास्त्र शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लपलेल्या विमानांवरही मारा करण्यास सक्षम आहे. याच्या मदतीने रडारमध्ये न दिसलेली विमानेही खाली पाडता येतील.
3 सेकंदात 2 क्षेपणास्त्रे डागता येतात
S-400 चे प्रक्षेपक 3 सेकंदात 2 क्षेपणास्त्रे डागू शकते. यातून सोडलेली क्षेपणास्त्रे 5 किलोमीटर प्रति सेकंदाच्या वेगाने निघतात आणि 35 किलोमीटर उंचीपर्यंत मारा करू शकतात. हे क्षेपणास्त्र आल्यामुळे भारताच्या उत्तर, उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम सीमेला सुरक्षा मिळेल.
ऑक्टोबर 2019 मध्ये झाला करार
S-400 क्षेपणास्त्र प्रणालीसाठी भारताने ऑक्टोबर 2019 मध्ये रशियासोबत करार केला होता. या अंतर्गत 5.43 अब्ज डॉलर्स (सुमारे 40 हजार कोटी रुपये) पाच S-400 रेजिमेंट खरेदी केल्या जातील. या क्षेपणास्त्रामुळे भारताची ताकत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.