नवी दिल्ली- भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. मंदिराच्या बाहेर भीक मागणा-या रशियन पर्यटकाला सुषमा स्वराज यांनी मदतीचा हात दिला आहे. भारतात आलेल्या इवनगेलीन नावाच्या पर्यटकाजवळचे पैसे संपले होते व त्याच्या एटीएमचा पिन नंबरही ब्लॉक झाला होता. त्यामुळे कांचीपूरममधल्या एका मंदिराच्या बाहेर तो पर्यटक भीक मागण्यासाठी हतबल झाला.इवनगेलीनला कांचीपूरममधल्या श्रीसुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या बाहेर भीक मागताना पाहून स्थानिक लोक हैराण झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्या तरुणाला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पोलिसांनी चौकशी केली असता इवनगेलीनजवळ व्यक्तिगत माहितीची सापडलेली कागदपत्रे योग्य होती. त्यानंतर पोलिसांनी याची माहिती परराष्ट्र खात्याला दिली.
हे सर्व समजल्यानंतर इवनगेलीनच्या मदतीसाठी सुषमा स्वराज पुढे आल्या असून, त्यांनी मदत करण्याचंही जाहीर केलं आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या, इवनगेलीन, तुमचा देश आमचा मित्र देश आहे. चेन्नईमधील माझे अधिकारी तुमची शक्य तितकी मदत करतील. पोलिसांनी सांगितलं की, तामिळनाडू फिरण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय रशियन तरुणाच्या एटीएमचं पिन लॉक झालं. त्यामुळे तो पैसे काढून शकला नाही व त्याला भीक मागावी लागली. यापूर्वीही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना मदत केली आहे.
ट्विटरच्या माध्यमातून नेहमी सक्रिय असणा-या केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानसोबतच्या कटू संबंधांना आड येऊन न देता पाकिस्तानी नागरिकांना मदतीचा हात दिला होता. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अद्यापही ताणलेले असून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण करताना सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत जागा दाखवून दिली होती. मात्र याचा परिणाम सुषमा स्वराज यांनी नागरिकांवर तसंच आपल्या कामावर होऊ दिलेला नाही. मेडिकल व्हिसासाठी विनंती करण-या दोन पाकिस्तानी नागरिकांना सुषमा स्वराज यांनी काही तासात उत्तर देत व्हिसा देण्याचं आश्वासन दिलं. लाहोरमधील उजैर हुमायून यांनी आपल्या तीन वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मेडिकल व्हिसा देण्याची विनंती केली होती. त्यांच्या मुलीला ह्रदयाचा आजार असून त्यासाठी त्यांना भारतात येऊन उपचार करायचे होते. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे व्हिसासाठी विनंती केली होती. 'माझ्या तीन वर्षाच्या मुलीची हार्ट सर्जरी करणं गरजेचं आहे. कृपया आम्हाला व्हिसा द्यावा. आम्ही तुमचे आभारी राहू', असं ट्विट त्यांनी केलं होतं.