नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन गंगाची (Operation Ganga) सुरुवात केली आहे. आता ही मोहीम अधिक जलदगतीनं राबवण्यासाटी मोदी सरकारमधील चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, त्या ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणार आहेत. हे मंत्री विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी समन्वय साधण्याचं काम पार पाडणार आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. "मंगळावर अडकलात तरी परत आणू" असं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून ते युक्रेनमधल्या भारतीयांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याविषयी बोलताना "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे. युक्रेनमध्ये अडचणीत असलेला एकही भारतीय नागरिक मागे राहणार नाही. युद्धक्षेत्रात बंधने आहेत, संभ्रम आहेत, सीमांवरही काही अडचणी आहेत. तुमच्याकडे संयम नसेल आणि तुम्ही सूचनांचे पालन केले नाही, तर परिस्थिती बिकट होऊ शकते" असं म्हटलं आहे.
मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना सिंह यांनी "तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल. ही भारताची रणनीती आहे. पंतप्रधान मोदी याबाबतीत दूरदृष्टीने विचार करत आहेत. त्यामुळे ते चार मंत्र्यांना पाठवत आहेत. सरकार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यांनी केवळ संयम ठेवून सुरक्षित राहावं" असं म्हटलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाद सध्या आणखी चिघळला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी जाणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही.के.सिंह हे युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी समन्वय कार्यासाठी जाणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीही आपात्कालीन बैठक बोलावली होती. यादरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला उपस्थित होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढणं हे आपलं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान मोदींनी या बैठकीदरम्यान सांगितलं.