हिंदी महासागरात रशियाच्या युद्धनौका! मदत लागली तर पुतीन भारताकडे आशा ठेवून..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:45 PM2023-12-01T22:45:08+5:302023-12-01T22:46:07+5:30
युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाने आशियाई देशांसोबत आपले संबंध सुधारण्यावर भर दिला आहे.
रशियाने युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हिंदी महासागरातही आपल्या युद्धनौका तैनात करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच युद्धनौकांचा मोठा ताफा भारताजवळ पोहोचला आहे. या ताफ्याने भारतीय नौदलासोबत युद्धाभ्यासही केला आहे. या युद्धनौका पहिल्यांदाच बांग्लादेशला गेल्या होत्या. याशिवाय रशियाने म्यानमारसोबतही युध्दसराव केला. एवढ्या सगळ्या हालचाली एकाचवेळी पुतीन का करत आहेत, याचे उत्तर जगभरातील युद्ध तज्ज्ञ शोधू लागले आहेत.
युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाने आशियाई देशांसोबत आपले संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. ज्या देशांसोबत रशियाचा व्यापार शून्याच्या बरोबरीत होता तिथेही रशियाने व्यापारी संबंध वाढविण्यास सुरुवात केली आहे. रशिया यासाठी भारताचा दुश्मन पाकिस्तानसोबतही संबंध वाढविण्यास मागेपुढे पाहत नाहीय. म्यानमारच्या सैन्याला रशिया सातत्याने शस्त्रास्त्रे पुरवत आहे.
भारत आणि चीन रशियन कच्च्या तेलाचे भुकेलेले आहेत. या देशांना कमी दराने रशियन तेल मिळत आहे. बांग्लादेश आणि श्रीलंकादेखील कच्च्या तेलासाठी रशियाकडे डोळे लावून बसलेले आहेत. भारताचा रशिया हा बऱ्याच काळापासून शस्त्रास्त्र पुरवठादार आहे, यामुळे तो कधीही रशियाच्या विरोधात जाणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. परंतू, चीनच्या हिंदी महासागरातील वर्चस्व वाढीविरोधात भारत अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत देखील आहे.
असे असले तरी भारत रशियाला देखील पूर्णपणे मदत करण्यास तयार आहे. यामुळेच भारताने पाश्चिमात्य देशांचा दबाव झुगारून लावला आहे. भारताने पुतीन यांच्यावर टीका करण्यासही नकार दिला होता. तसेच त्यांच्याकडून तेल खरेदी न करण्यासही नकार दिला होता. भारत 2020 पासून हिमालयीन सीमेवर चीनसोबत लष्करी संघर्षात अडकला आहे. तर चीनने श्रीलंकेतही मोठे बंदर ताब्यात घेतले आहे. चिनी संशोधन जहाजे या बंदरात ये-जा करत असतात. यामुळे भारताला अमेरिकेएवढीच रशियाचीही गरज असल्याचे मत तज्ज्ञांचे आहे.