मडगाव : पाणबुड्या, युद्धनौका आणि लढाऊ हेलिकॉप्टर्स या तीन गोष्टींसाठी रशिया भारताबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. यासंबंधीची बोलणीही चालू आहेत, अशी माहिती रशियन पथकाचे प्रमुख सेर्जीई गोरेस्लावस्की यांनी सांगितले. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडात शस्त्रास्त्र संबंधातील तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यास रशियाला उत्सुकता आहे, असे ते म्हणाले.किटल-नाकेरी येथील डिफेन्स एक्स्पोमध्ये रशियाने सर्वांत मोठे दालन थाटले असून त्यात ‘वेर्बा’ या मनुष्याला सहजपणे वाहून नेता येईल, अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राचाही समावेश आहे. पहिल्यांदाच जागतिक प्रदर्शनात ही प्रभावी क्षेपणास्त्रे ठेवण्यात आली आहेत. संरक्षण क्षेत्रात यापूर्वीही रशियाने भारताला सहकार्य केले आहे. सध्या भारत सरकार ८८७ टन वजन गटातील पाणबुडीचे परिमाण निश्चित करण्याच्या विचारात आहे. त्यासंदर्भात रशियाचे शिपबिल्डींग महामंडळ सहकार्य देऊ शकते. त्याशिवाय भारतीय नौदलात असलेल्या पाणबुडींचे आधुनिकीकरण करण्यातही रशियाचे भारताला सहकार्य लाभू शकते. यासंदर्भात या एक्स्पोत चर्चा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मेक इन इंडिया हे धोरण जागतिक कंपन्यांना भारताशी संरक्षण क्षेत्रात व्यवहार करण्यासाठी पोषक धोरण असून त्यात सामील होण्यास रशियाही उत्सुक आहे, असे गोरेस्लावस्की म्हणाले. या चर्चेत रशियन शिष्टमंडळाचे दिमित्री शागायेवा, व्लादिमीर ड्रोझलेव्ह तसेच ग्रेगरी अँटोसेव्ह यांनी भाग घेतला. या एक्स्पोत रशियाचे टी-९0 एमएस रणगाडे, बीएमपी-३ कॉम्बेट गाड्या, कालाशिनिको रायफल्स, अमूर पाणबुडी याशिवाय इतर शस्त्रसामग्रीचा समावेश आहे. त्यामुळे रशियाचे हे दालन सर्वांसाठी कुतुहलाच विषय ठरले आहे. (प्रतिनिधी)
पाणबुड्यांसाठी रशियाचे सहकार्य
By admin | Published: March 30, 2016 1:01 AM