भारताच्या नंतर निघालेले आणि चंद्रावर आधी पोहोचणारे रशियाचे लुना-२५ हे मिशन तांत्रिक अडचणींमुळे चंद्रावर जायच्या मार्गातून भरकटले आहे. रशियन अंतराळ संस्था यानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, असे असताना ते चंद्रयानापूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता कमी आहे. भारतासाठी ही एक संधी असणार आहे.
चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने 17 ऑगस्ट 2023 रोजी प्रोपल्शन मॉड्यूल सोडले होते. यानंतर लँडर एकटाच पुढे मार्गक्रमन करत होता. 18 ऑगस्टच्या दुपारी विक्रम लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल 153 किमी x 163 किमीच्या कक्षेत होते. मात्र 4 वाजण्याच्या सुमारास दोघांचे मार्ग वेगळे झाले होते.
यानंतर विक्रम लँडर 113 किमी x 157 किमीच्या कक्षेत आले. तेव्हा त्याचे अंतर चंद्राच्या भूमीपासून फक्त 113 किलोमीटर होते. सध्या विक्रम लँडर रेट्रोफिटिंग म्हणजेच विरुद्ध दिशेने जात आहे. विक्रम लँडर आता उंची आणि वेग कमी करत आहे. आजच्या रात्री विक्रम लँडरला डीबूस्ट करण्यात आले. यामुळे ते चंद्रापासून केवळ 24 ते 30 किमी अंतरावर पोहोचले आहे.
150 किलो इंधन शिल्लक असल्याची पुष्टी इस्रो प्रमुखांनी केली आहे. 14 जुलै रोजी प्रक्षेपणाच्या वेळी, 1,696.4 किलो इंधन प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये लोड केले गेले होते. दुसरे आणि अंतिम डीबूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे आणि त्याचे लँडर खूप कमी कक्षेत आणले गेले आहे. आता मॉड्यूलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि नियुक्त केलेल्या लँडिंग साइटवर सूर्यप्रकाशाची प्रतीक्षा केली जाईल, असे इस्त्रोने ट्विट केले आहे. लँडिंगची वेळ 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.45 वाजता निर्धारित केली आहे.