लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/ इस्लामाबाद: भारत व पाकिस्तान यांच्यातील काश्मीरचा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लाादिमिर पुतिन यांनी प्रत्यक्षात कधीही दाखविलेली नसूनही तसा कपोलकल्पित दावा करून पाकिस्तान गुरुवारी चांगलेच तोंडघशी पडले.कझागस्तानची राजधानी अस्ताना येथे ‘शाघाय कोआॅपरेशन कौन्सिल’च्या निमित्ताने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ व पुतिन यांची गेल्या आठवड्यात भेट झाली तेव्हा रशियन राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थीचा प्रस्ताव केल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिले. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही.पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांना दुपारी साप्ताहिक वार्तालापाच्या वेळी विचारले तेव्हा त्यांनी यास केवळ दुजोराच दिला नाही तर पुतिन यांच्या या कथित प्रस्तावाचे स्वागतही केले. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपुढे प्रदीर्घ काळ प्रलंबित या विषयात लक्ष घालण्याच्या व त्यात भूमिका बजावण्याच्या रशियाने व्यक्त केलेल्या इराद्याचे पाकिस्तान स्वागत करतो.नवी दिल्लीत याविषयी विचारले असता भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले, नवी दिल्ली व इस्लामाबाद यांच्यात मध्यस्थीचा प्रस्ताव रशियाने भारताकडे केला नाही. दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरणात सर्व प्रलंबित प्रश्न द्विपक्षीय पातळीवर सोडविण्याच्या भारताच्या भूमिकेची रशियाला पूर्ण कल्पना आहे.दिल्लीतील रशियन वकिलातीमधील अधिकाऱ्यांनीही याचा इन्कार केला व हा पाकिस्तानचा ‘निव्वळ कल्पनाविलास’ असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)फटफजितीचा महिना : एकूणच परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीने पाकिस्तानला हा महिना वाईट गेला आहे. रियाधमध्ये नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याची खूप धडपड केली, पण ट्रम्प यांनी त्यांना भेट दिली नाही. एरवी घनिष्ट मित्र म्हणविणाऱ्या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही अस्ताना येथे भेट नाकारून नवाज शरीफ यांना अंगठा दाखविला होता.
रशियाच्या मध्यस्थीवरून पाकिस्तान पडले तोंडघशी!
By admin | Published: June 16, 2017 12:35 AM