सीतापूर- अमृतसरहून सहरसा (बिहार)ला जाणाऱ्या जनसेवा एक्स्प्रेसमधून निर्दयी वडिलांनी आपल्या तीन लहान मुलींना चालत्या ट्रेनमधून फेकून दिल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी तीन ते चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत तीनपैकी एका मुलीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली मुलगी सहा वर्षाची असून मानपूर क्षेत्रातील रेल्वे रूळाजवळ तिचा मृतदेह सापडला. इतर दोन मुली रामकोट क्षेत्रातील रेल्वे रूळावार गंभीर जखमी झालेल्या सापडल्या.
स्थानिक लोकांनी या प्रकरणाची पोलिसांना माहिती देऊन दोन जखमी मुलींना जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. याप्रकरणी पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये पोहचून मुलींकडून घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. पोलिसांकडून या मुलींच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जातो आहे. मंगळवारी सकाळी जनसेवा एक्स्प्रेस रामकोट क्षेत्रातून जात होती. या दरम्यान ट्रेनमधून आठ वर्षाच्या एका मुलीला भवानीपूर आणि पाच वर्षीय मुलीला गौरा गावाजवळ ट्रेनमधून फेकलं. या दोन मुलींना रेल्वे रूळावर गंभीर जखमी अवस्थेत पाहून
स्थानिकांनी त्यांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. चौकशी दरम्यान आठ वर्षीय मुलीने तिची ओळख अल्बतुन अशी सांगितली असून ती बिहारची रहिवासी आहे. तर दुसऱ्या जखमी मुलीचं नाव सलीना आहे. अल्बतुनने दिलेल्या माहितीनुसार ट्रेनमधून प्रवास करताना तिच्यासोबत वडील इद्दू आणि आई होती. त्या दोघांनी एक-एक करून आम्हाला खाली फेकल्याचं तिने सांगितलं.
मंगळवारी दुपारनंतर मानपूर भागातील रमईपूर हॉल्टपासून जवळ एका सहा वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. तो मृतदेह अल्बतुनने ओळखला असून मृत मुलगी आपली बहिण मुनिया असल्याचं तिने सांगितलं आहे.