नवी दिल्ली, दि. 6 - भारत लवकरच रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार असून, त्या दिशेने भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. भारतीय हवाई दलाने नुकत्याच या क्षेपणास्त्राच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. हवाई दलाच्या ताफ्यात S-400 एअर डिफेन्स सिस्टीमचा समावेश झाल्यानंतर हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार आहे.
S-400 सिस्टीमच्या समावेशानंतर शत्रूची लढाऊ, टेहळणी विमाने, क्रूझ मिसाईल आणि ड्रोन विमाने 400 किलोमीटर अंतरावर असतानाच नष्ट करता येऊ शकतात. रशियामध्ये भारतीय हवाई दलाच्या अधिका-यांनी दोनवेळा या सिस्टीमच्या यशस्वी चाचण्या घेतल्या. या सिस्टीममुळे भारताला आपल्या हद्दीत राहूनच चीन आणि पाकिस्तानचे हवाई हल्ले निष्प्रभ करता येतील तसेच हवाई वर्चस्वही मिळवता येईल.
या चाचण्या पूर्ण झाल्यामुळे संरक्षण मंत्रालयाचा रोसोबोरॉनएक्सपोर्ट या कंपनीबरोबर खरेदी प्रक्रिया सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही कंपनी रशियाच्या अन्य देशांबरोबरच्या संरक्षण व्यवहाराचे काम पाहते. त्यात किंमती ठरवणे, डिलव्हरी या विषयांचा समावेश असतो. S-400 एअर डिफेन्स सिस्टीम महागडी असली तरी, भारताला ही सिस्टीम हवी आहे. या सिस्टीममुळे आपल्या पाकिस्तानवर वरचढ होता येईल तसेच आपण चीनशी बरोबरी साधता येईल. कारण चीनने आधीच ही सिस्टीम विकत घेतली आहे.
काय आहे एअर डिफेंन्स सिस्टीम
- रशियाच्या अलमाझ अँटे कंपनीने S-400 एअर डिफेंन्स मिसाईल सिस्टीम बनवली आहे. यामध्ये रडार, मिसाइल लाँचर्सचा समावेश आहे.
- 400 किलोमीटरच्या टप्प्यातील 36 लक्ष्याचा एकाचवेळी लक्ष्यभेद करण्याची क्षमता या सिस्टीममध्ये आहे.
- या सिस्टीममुळे पाकिस्तानचे सर्व हवाई तळ आणि तिबेटमधील चीनचे लष्करी तळ भारताच्या रेंजमध्ये येतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीत 17 व्या भारत-रशिया परिषदेत एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम विक्रीचा करार झाला. मागच्यावर्षी ऑक्टोंबर 2016 मध्ये हा करार झाला होता.
मागच्यावर्षी भारत-रशिया 17 व्या परिषदेत भारत आणि रशिया यांनी अनेक मोठ्या संरक्षण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार भारत रशियाकडून क्षेपत्रास्त्र यंत्रणेची खरेदी करेल. तसेच दोन्ही देश मिळून फ्रिगेटस् आणि लष्करी हेलिकॉप्टरांचे संयुक्तरीत्या उत्पादन करतील. याशिवाय विविध क्षेत्रांतील सहकार्य आणखी मजबूत करण्याचा तसेच दहशतवादाचा संयुक्तपणे मुकाबला करण्याचा निर्णयही दोघांनी घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्यापक चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांनी एकूण १६ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. याशिवाय तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. दोन्ही नेत्यांनी कुडनुलम अणुऊर्जा प्रकल्पातील एका युनिटचे लोकार्पण केले. लष्करी करारानुसार भारत रशियाकडून गेमचेंजर एस-४00 ट्रायंफ हवाई सुरक्षा यंत्रणा विकत घेणार आहे. तिची किंमत ५ अब्ज डॉलर आहे. दोन्ही देश मिळून ४ अत्याधुनिक फ्रिगेटची बांधणी करणार आहेत, तसेच कामोव्ह हेलिकॉप्टरसाठी निर्मिती प्रकल्प उभारणार आहेत.