नवी दिल्ली - भारताने रशियाबरोबर हवाई हल्ल्यापासून संरक्षण देणा-या एस-४00 मिसाइल सिस्टीम खरेदीचा करार केला आहे. 39 हजार कोटी रुपयांचा हा करार प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताने रशियाबरोबर अंतिम फेरीची चर्चा सुरु केली आहे. एस-४00 ट्रायंफ एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीमच्या समावेशानंतर भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होईल. एस-४00 मिसाइलचे वैशिष्टय म्हणजे ही सिस्टीम शत्रूने डागलेली क्षेपणास्त्रे, स्टेल्थ फायटर विमाने तसेच हेर विमाने शोधून हवेतच नष्ट करते.
एस-४00 मिसाइल 400 किलोमीटरच्या टप्प्यातील 30 किलोमीटर उंचीवरुन उड्डाण करणा-या कुठल्याची लक्ष्याचा अचूक भेद करु शकते. या सिस्टीमुळे भारताला चीन-पाकिस्तानचे हवाई हल्ले सहज परतवून लावता येतील. 2018-19 आर्थिक वर्षात या करारावर शिक्कामोर्तब करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. करारावर अंतिम स्वाक्षरी झाल्यानंतर दोनवर्षांनी ही सिस्टीम भारताला मिळेल. भारत रशियाकडून एस-400 च्या पाच सिस्टीम्स विकत घेणार असून क्रूझ क्षेपणास्त्राबरोबर आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्रही यातून डागता येऊ शकतात.
करारानंतर साडेचारवर्षांनी सर्वच्या सर्व पाच सिस्टीम्स भारताला मिळतील. ही सिस्टीम भारताला मिळाल्यानंतर आशिया खंडातील हवाई सुरक्षेची सर्व समीकरणे बदलून जातील असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. चीनने रशियाकडून आधीच एस-400 मिसाइल सिस्टीम विकत घेतली आहे. रशियाने युक्रेनला लागून असणा-या सीमेवर क्रिमियामध्ये एस-400 सिस्टीम तैनात केली आहेत.
जगातील अनेक देशांना या मिसाइलमध्ये रस असून टर्की आणि सौदी अरेबियाही रशियाकडून ही सिस्टीम विकत घेणार आहे. युद्ध प्रसंगात भारताला या सिस्टीमचा खूप फायदा होईल. एस-400 ने भारताला पाकिस्तानच्या छोटया पल्ल्याच्या नासर या अण्वस्त्र क्षेपणास्त्राचा हल्ला निष्प्रभ करता येईल. एकूणच एस-400 च्या समावेशाने भारताची हवाई ताकत कैकपटीने वाढणार आहे.