S Jaishankar India Canada Relations: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी(दि.22) भारत-कॅनडा संबंधांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, कॅनडाच्या कर्मचार्यांनी देशाच्या कारभारात सतत हस्तक्षेप केल्यामुळे भारताने कॅनडाशी राजनैतिक समानतेची मागणी केली, ज्यामुळे त्यांना आपले 41 अधिकारी परत बोलवावे लागले. एका देशात किती नौकरशहा आहेत आणि दुसर्या देशात किती आहेत, यावरुन समानता ठरवली जाते. ही समानता व्हिएन्ना कन्व्हेन्शनद्वारे प्रदान केली गेली आहे, अशी प्रतक्रिया जयशंकर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, आम्ही समानतेची मागणी केली, कारण आम्हाला कॅनेडियन अधिकाऱ्यांकडून आमच्या कारभारात होणाऱ्या सततच्या हस्तक्षेपाची चिंता होती. मला विश्वास आहे की कालांतराने अधिक गोष्टी प्रकाशात येतील आणि लोकांना समजेल की, आम्हाला हा निर्णय का घ्यावा लागला.
भारत-कॅनडा संबंधांवर जयशंकर म्हणाले की, सध्या संबंध कठीण टप्प्यातून जात आहेत. भारताची समस्या कॅनडाच्या काही राजकीय मुद्द्यांशी आहे. कॅनडाचा व्हिसा देणे पुन्हा कधी सुरू होईल? या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, जर आम्हाला कॅनडातील आमच्या डिप्लोमॅट्सच्या सुरक्षेत प्रगती दिसली, तर आम्ही व्हिसा जारी करण्यास पुन्हा सुरुवात करू.
तणाव वाढला...जस्टिन ट्रूडो सरकारने 41 अधिकाऱ्यांना परत बोलावल्याची घोषणा केल्यावर भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला. भारताने ठरवून दिलेल्या मुदतीच्या एक दिवस आधीच सरकारने त्यांच्या अधिकाऱ्यांना माघारी बोलावले. विशेष म्हणजे, कॅनडात एका खलिस्तानी समर्थकाच्या हत्येनंतर हा वाद निर्णय झाला आहे. कॅनडाने या हत्येत भारतावर आरोप केला आहे. पण, भारताने या आरोपाचे खंडन केले आहे.