Congress Vs BJP:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भारतात लोकशाहीसाठी लढा सुरू ठेवण्याबाबत राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केले होते. 'भारत हा मोठा देश आहे आणि देशातील लोकशाही नष्ट झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल', असे ते म्हणाले होते. त्यावर आता परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी निशाणा साधलाय.
परराष्ट्रमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोलराहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांकडून टीका होत आहे. मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी (8 जून) म्हटले की, "त्यांना (राहुल गांधी) पररदेशात जाऊन देशावर आणि आपल्या राजकारणावर टीका करण्याची सवय झाली आहे. या देशात निवडणुका होतात आणि कधी एक पक्ष जिंकतो, तर कधी दुसरा पक्ष, याकडे जग पाहत आहे. देशात लोकशाही नसेल तर असा बदल होऊच शकत नाही,'' असं ते म्हणाले
स्मृती इराणी यांची टीकाकेंद्रीय मंत्री इराणी यांनी गुरुवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ''काँग्रेस नेतृत्व देशाच्या लोकशाहीला दुखावण्यासाठी बाह्य शक्तींचा कसा वापर करत आहे, हे भाजप पूर्वीपासूनच सांगत आहे. जशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे काँग्रेस नेत्यांच्या अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. सत्तेची भूक असलेल्या काँग्रेसला देशाच्या लोकशाही व्यवस्थेला धक्का द्यायचा आहे,'' अशी टीका त्यांनी केली.
अधीर रंजन चौधरींचा पलटवार
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना चौधरी म्हणाले की, ''जयशंकरजी निवडणूक आयोगाशी बोलत असावेत, अन्यथा कोण जिंकेल, हे त्यांना कसे कळाले. या लोकांचा अशा लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यात लोक मतदान करण्यापूर्वीच ते (भाजप) निवडणुकीचे निकाल सांगू लागतात. जयशंकर यांच्या मते ही लोकशाही आहे,'' अशी टीका त्यांनी केली.