S Jaishankar News: देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीनबाबत भारताचे धोरण स्पष्ट केले असून, यातून दोन्ही देशांना एक थेट संदेश दिला आहे. भारतातील दहशतवादामागे पाकिस्तानचा हात आहे. सीमेपलीकडील दहशतवादाच्या माध्यमातून भारतावर चर्चेसाठी दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही पाकिस्तानशी चर्चा करू पण त्याच्या अटींवर नाही. तसेच कॅनडात खलिस्तानी ताकद मजबूत होत आहेत, हे भारताच्या किंवा कॅनडाच्या हिताचे नाही, असे एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.
एका मुलाखतीत बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, भारतासोबत चर्चा व्हावी, यावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तान सीमापार दहशतवादाचा वापर करत आहे. आम्ही आमच्या शेजाऱ्यांशी वाटाघाटी करणार नाही, असे नाही. मात्र, पाकिस्तानने ज्या अटी घातल्या आहेत त्याआधारे आम्ही वाटाघाटी करणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
चीनला प्रत्युत्तर देण्यावरून नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात मतभेद होते
भारत आणि चीनसोबतच्या संबंधांवर बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, नेहरूंनी चीन फर्स्ट या धोरणावर काम केले. नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात सुरुवातीपासूनच चीनला प्रत्युत्तर कसे द्यायचे यावर मतभेद होते. सरदार पटेल यांनी चीनशी व्यवहार करताना सुरू केलेल्या वास्तववादाच्या प्रवाहानुसार मोदी सरकार काम करत आहे. परस्पर संबंधांवर आधारित असे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी या गोष्टींवर मान्यता असल्याशिवाय संबंध पुढे जाऊ शकत नाहीत, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारत-कॅनडा संबंध आणि खलिस्तानी मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, मुख्य मुद्दा हा आहे की, कॅनडाच्या राजकारणात खलिस्तानी शक्तींना भरपूर स्थान देण्यात आले आहे. संबंधांना हानी पोहोचवणाऱ्या कामांमध्ये गुंतण्यासाठी त्यांना मोकळीक दिली आहे. मला वाटते हे ना भारताच्या हिताचे आहे ना कॅनडाच्या हिताचे आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.