S Jaishankar on China : भारत आणि चीनमध्ये सीमावादाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशातच लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर तर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच चिघळले आहेत. त्या घटनेनंतर दोन्ही देशांदरम्यान अनेक शांतता बैठका झाल्या, मात्र त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या संबंधावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
...तरच संबंध सुधारतीलपीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, चीनसोबत आपले संबंध सामान्य नाहीत, कारण सीमाभागातील शांतता भंग पावली आहे. पीएम मोदींनी स्पष्टपणे म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती चीनच्या हिताची नाही, हे चीनने लक्षात घेतले पाहिजे. सीमेवरील परिस्थितीवर चर्चा करण्याची नितांत गरज आहे आणि भारत आणि चीनमधील शांततापूर्ण संबंध केवळ दोन देशांसाठीच नाही, तर संपूर्ण प्रदेश आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत.
जयशंकर पुढे म्हणाले की, मुत्सद्देगिरी हे संयमाचे काम आहे आणि भारत चीनशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करत आहे. संबंध सामान्य करायचे असतील तर सर्व समस्या सोडवायला हव्यात. आम्ही चीनसोबतच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्सुक आहोत. दोन्ही देशातील संबंध सुधारणे, हे सीमेवरील शांततेवर अवलंबून आहे. भारताला आशा आहे की, चीनसोबतचे सर्व प्रश्न सुटतील.