नवी दिल्ली - रशिया-युक्रेन युद्धादरम्यान (Russia Ukraine War) भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम अत्यंत अवघड होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींशी बोलून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा मार्ग तयार केला. आज लोकसभेत ऑपरेशन गंगाबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar in Parliament) म्हणाले, एकादा तर, सुमीमध्ये विद्यार्थी बसमध्ये बसले होते, तेव्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. यानंतर स्वतः पंतप्रधानांनीच मोर्चा सांभाळत विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती.
जयशंकर यांनी सांगितला 'तो' थरकाप उडवणारा क्षण -एस जयशंकर यांनी लोकसभेत सांगितले, की खार्किवमध्ये गोळीबार सुरू होता. सुमीमध्येही युक्रेन आणि रशिया यांच्यात गोळीबार सुरू होता. पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना फोन केला. त्यावेळी मीही तेथे होतो. त्यांनी खार्किवमधील गोळीबार थांबवण्यासंदर्भात पुतीन यांना आवाहन केले. यावेळी, आमचे विद्यार्थ्यांना संकटात आहेत, असे मोदी यांनी पुतीन यांना सांगितले. या संभाषणामुळेच आपल्याला पुरेसा वेळ मिळाला आणि आपले विद्यार्थ्यी खार्किव्ह सोडून सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकले.
सुमीमध्ये विद्यार्थी बसमध्ये असतानाच सुरू झाला होता गोळीबार - जयशंकर म्हणाले, सुमीच्या एका भागात विद्यार्थी बसमध्ये बसले होते, आम्ही निघणार, तोच पुन्हा गोळीबार सुरू झाला. तेव्हा पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशाच्या राष्ट्रपतींना फोन केला. कारण हे दोन्ही लोक दुसऱ्या बाजूने गोळीबार होत असल्याचे सांगत होते. यावेळी, आम्हाला एक ठरावीक वेळ द्या, असे पीएम मोदींनी दोन्ही नेत्यांना समजावून सांगितले. आपण आपल्या सैनिकांना गोळीबार थांबवण्यास सांगितल्यास आम्ही निघू, असे पंतप्रधान म्हणाले. यानंतर दोन्ही देशांनी गोळीबार थांबवला. मग आम्ही युक्रेनची मदत घेतली आणि त्यांचे संरक्षणही घेतले. याशिवाय रेडक्रॉसची मदत घेतली आणि नंतर आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले. यावेळी जयशंकर यांनी विद्यार्थ्यांच्या धैर्याचे कौतुकही केले.