S Jaishankar slams Canada: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची कॅनडात हत्या झाली. तेव्हापासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. अशातच कॅनडा पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली असून, हे तिघेही भारतीय असल्याचे कॅनडा पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे आता परत एकदा भारत आणि कॅनडामध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी प्रकरणावरुन कॅनडा सरकार आणि पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
फक्त आरोप नको, पुरावे दाखवाओडिशातील एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की, कॅनडा त्यांच्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांसाठी भारताला जबाबदार धरतो. पण, ते कधीही पुरावे देत नाही. मी ऐकले की, कॅनडा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आता कॅनडाने त्या तिघांबद्दल आम्हाला अधिक माहिती द्यावी, आम्ही त्याचीच वाट पाहत आहोत. फक्त आरोप करण्यापेक्षा कॅनडा सरकारने पुरावे सादर करावे. त्यांनी आतापर्यंत असा कुठलाही पुरावा दिला नाही, ज्यामुळे या प्रकरणात भारताचा सहभाग सिद्ध होईल. आम्ही कॅनडा सरकारला वारंवार पुरावे दाखवण्याची मागणी केली आहे.
कॅनडाच्या सरकारवर गंभीर आरोपपंजाबमधील संघटित गुन्ह्यांशी संबंधित गुन्हेगारांना व्हिसा दिल्याबद्दल एस जयशंकर यांनी कॅनडाच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, पंजाबमधील संघटित गुन्हेगारीशी संबंधित अनेकांना कॅनडात राहण्याची परवानगी दिली जाते. आम्ही कॅनडाला वारंवार सांगतो की, भारतातील वॉन्टेड गुन्हेगारांना व्हिसा देऊ नका. अनेक लोक खोट्या कागदपत्रांवर कॅनडाला जातात आणि तेथील सरकार त्यांना राहण्याची परवानगी देते. भारताने 25 खलिस्तानी समर्थकांची माहिती कॅनडाला दिली आणि त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली, परंतु कॅनडाने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी कॅनडावर केला.
कॅनडा भारतासाठी मोठी समस्यापरराष्ट्रमंत्र्यांनी कॅनडा ही भारताची सर्वात मोठी समस्या असल्याचे म्हटले. ते म्हणाले, आज कॅनडामध्ये जे सरकार आहे, त्यांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली अतिरेकी, फुटीरतावाद आणि हिंसाचाराचा पुरस्कार करणाऱ्यांना आसरा दिला आहे. अशा लोकांनी स्वतःला राजकीयदृष्ट्या संघटित केले आहे आणि एक राजकीय लॉबी बनवली आहे. यापैकी अनेकांनी तिथल्या राजकारण्यांचा विश्वास मिळवला आहे. अमेरिकेत अशाप्रकारची समस्या नाही, सध्या भारताची सर्वात मोठी समस्या कॅनडा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.